राज्यात २८ लाख टन ऊस शिल्लक
By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:34+5:302016-04-03T03:51:34+5:30
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून,अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. ज्या कारखान्यांनी फेबु्रवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ८० टक्क्यांप्रमाणे
कोल्हापूर : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून,अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. ज्या कारखान्यांनी फेबु्रवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ८० टक्क्यांप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिला आहे.
राज्यातील साखर कारखान्याच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी पुण्यात झाली. यामध्ये ‘एफआरपी’मधील ८० टक्के व २० टक्के किती कारखान्यांनी दिले, त्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७२२.८० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्याचे नियोजन कसे केले, याची माहितीही आयुक्त बिपीन शर्मा यांनी घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण तडजोडीनुसार ८०:२० फॉर्म्युला मान्य केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे द्या. फेब्रुवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाला ताबडतोब ८० टक्क्यांप्रमाणे पैसे द्या. त्याचबरोबर ज्या कारखान्यांचा हंगाम संपला आहे, त्यांनी १५ एप्रिलपर्यंत उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे आदेश शर्मा यांनी बैठकीत दिले. निर्यातीस टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही शर्मा यांनी दिला. (प्रतिनिधी)
निर्यात अनुदान लवकरच!
साखर निर्यातीवर केंद्र सरकार प्रतिटन ४५ रुपये अनुदान देणार आहे. ते देण्यास विलंब होत असला, तरी लवकरच संबंधितांना मिळणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी बैठकीत सांगितले.
शिल्लक उसाच्या गाळपाचे आव्हान
चालू साखर हंगामात सुरू असलेल्या १७७ पैकी १३२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. ४५ कारखान्याने सुरू असून, त्यांच्यापुढे अजून २८ लाख टन ऊसगाळप करण्याचे आव्हान आहे. जवळपास ३० हजार हेक्टर ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्याचे मोठे आव्हान आहे.