धावत्या ट्रेनमधून २८ लॅपटॉपची चोरी
By admin | Published: January 28, 2017 04:18 AM2017-01-28T04:18:10+5:302017-01-28T04:18:41+5:30
मुंबईतून बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या पार्सल वॅगनचा डबा फोडून तब्बल २८ लॅपटॉप चोरणाऱ्या तीन आरोपींना लोहमार्ग पोलिसांकडून अटक
मुंबई : मुंबईतून बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या पार्सल वॅगनचा डबा फोडून तब्बल २८ लॅपटॉप चोरणाऱ्या तीन आरोपींना लोहमार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यात २८ पैकी ३० लाख रुपये किमतीचे २७ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली.
नकुश ओझोप हे १७ सप्टेंबर २0१६ रोजी कोणार्क एक्स्प्रेसने पुणे ते मुंबई असा प्रवास करीत होते. तेव्हा त्यांची रोख रक्कम १,८00 रुपये, लेनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स चोरीला गेले. त्याबाबत सीएसटी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात फिरोजाबाद येथे राहणारा आरोपी जगदीश सोनी याचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी फिरोजाबाद येथे जाऊन सोनी याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कमल यादव आणि दिनेश निर्मल असे दोन साथीदारही असल्याची कबुली दिली. त्यानंतर यातील आरोपी कमल यादव याने सप्टेंबर २0१६ मध्ये बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या पार्सल वॅगनचा डबा फोडून त्यामधून अॅपल कंपनीच्या २८ लॅपटॉपची चोरी केली आणि ते लॅपटॉप फिरोजबाद येथे ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत बंगळुरू पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर पारसमल मोदी यांनी लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार दिल्याचे स्पष्ट झाले.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फिरोजाबाद येथे जाऊन पारसमल मोदी यांच्या मालकीचे ३0 लाख ६७ हजार ५४९ रुपये किमतीचे २७ लॅपटॉप आणि नकुश जोजेब यांच्या मालकीचा ३१ हजार ९00 रुपये किमतीचा लेनोव्हाचा लॅपटॉप हस्तगत केला व त्याचबरोबर एक मोटारोला कंपनीची वॉकीटॉकी चार्जरसह जप्त करण्यात आली. यासंदर्भात पोलीस उपआयुक्त (मध्य परिमंडळ) समाधान पवार यांनी सांगितले की, धावत्या ट्रेनमध्ये ही चोरी करण्यात आली होती. यात डब्यातील एका भागाचे स्क्रू काढण्यात आले आणि ही चोरी करण्यात आली. चोरीच्या वेळी वापरण्यात आलेली साधनेही हस्तगत करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
उद्यान एक्स्प्रेसमध्ये केली चोरी
उद्यान एक्स्प्रेसने मुंबई सोडल्यानंतर सोलापूरच्या जवळपास ही चोरी केली. दोन तासांत चोरी केल्यानंतर एका ठिकाणी उतरून त्यांनी पलायन केले.
गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलीस उपआयुक्त समाधान पवार, साहाय्यक पोलीस आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महानोर व त्यांच्या पथकाने केला.