CM Eknath Shinde: २८ मे आता ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:12 PM2023-04-11T12:12:40+5:302023-04-11T12:15:08+5:30
CM Eknath Shinde: ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
CM Eknath Shinde: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या अपमानानंतर भाजप आणि शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता. वीर सावरकर यांची माहिती आणि त्यांचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. मात्र, आता २८ मे हा दिवस महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती, असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2023
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही!
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढली आहे. सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे, तो आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. पूर्वी हिंदुत्व हा शब्द उच्चारायला लोक कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मानसन्मान जागा झाला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते.
दरम्यान, सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप-शिंदे गटातर्फे राज्यातील २२ जिल्ह्यांत ही गौरव यात्रा काढण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"