सावधान! महाराष्ट्रात होतेय रोज २८ जणांचे अपहरण; सरकारी आकडेवारीतून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:11 AM2022-09-15T07:11:04+5:302022-09-15T07:11:22+5:30
घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ; उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक घटना
चंद्रकांत दडस
मुंबई : लग्न, लैंगिक छळ करण्यासाठी, पालकांनी शिव्या दिल्यामुळे घर सोडणे आणि प्रेम प्रकरणासह इतर घटनांमध्येे अपहरण होण्याच्या घटनांत देशात वाढ झाली आहे. देशात मुलींचे अपहरण सर्वाधिक होत असून, यातही २० वर्षांच्या आसपास वय असलेल्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्रातून रोज २८ जणांचे तर देशात २७८ हून अधिक जणांचे अपहरण होत असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
देशात रोज ८६ पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार!
२०२१ मध्ये देशभरात एकूण ३१,६७७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज सरासरी ८६ हून अधिक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या. २०२० च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे १३ टक्के वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये बलात्काराची सर्वाधिक ६,३३७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. राजस्थाननंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसामचा क्रमांक लागतो.
दररोज ८० हून अधिक खून
२०२१ मध्ये देशात एकूण २९,२७२ हत्या झाल्या. म्हणजेच देशात दररोज ८० हून अधिक हत्या झाल्या. २०२० च्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये ०.३ टक्के वाढ झाली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खुनाच्या घटना घडतात. २०२१ मध्ये येथे एकूण ३,७१७ हत्या झाल्या. यानंतर बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. या प्रकारांंना आवर घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
काय सांगतो अहवाल?
अहवालानुसार, २०२१ मध्ये देशात गुन्हेगारी घटनांमध्ये ७.६ टक्के घट झाली असली तरीही खून, अपहरण, महिला, बालकांवरील गुन्हे वाढले आहेत. देशात अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये देशभरात एकूण १,०१,७०७ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज २७८ हून अधिक अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्के वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपहरणाच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात अपहरणाची १०,५०२ प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्रानंतर बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अपहरणाची नोंद झाली आहे.
बालगुन्हेगारीत वाढ
मध्य प्रदेशात लहान मुलांविरुद्धच्या सर्वाधिक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये लहान मुलांविरोधातील एकूण १९,१७३ गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. राज्यात एकूण १७,२६१ बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली.