सीईटीमध्ये २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 10:11 AM2023-06-13T10:11:56+5:302023-06-13T10:18:01+5:30
५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सोमवारी जाहीर केला असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटात १४ विद्यार्थ्यांनी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल मिळवले आहेत.
एमएचटी सीईटीसाठी राज्यात १९७, तसेच राज्याबाहेरील १६ केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रांत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी, तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस
यंदाच्या निकालात १०० पर्सेंटाइलचेच २५ हून अधिक विद्यार्थी असल्याने ९५ आणि त्याहून अधिकच्या गुणांची विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच अधिक असेल. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये विविध शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहावयास मिळणार आहे.
पैकीच्या पैकी घेणारे गुणवंत
- मुंबई १३
- पुणे ७
- सातारा २
- अमरावती १
- कोल्हापूर २
- नागपूर १
- नाशिक १
- औरंगाबाद १