मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 08:56 AM2024-11-19T08:56:31+5:302024-11-19T08:57:21+5:30
शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरोग्य विमा अशा विविध योजना राबविल्या जातील, असे आश्वासनही खरगे यांनी वसईतील जनतेला दिले.
वसई : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम २ लाख ८० हजार जणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच डिसेंबरपासूनच त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वसईतील सभेत सोमवारी दिले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्यातील महिला, शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेतून प्रतिमहिना तीन हजार रुपये, महिलांसाठी मोफत बस प्रवास, ५०० रुपयांत एक याप्रमाणे सहा गॅस सिलिंडर, १०० युनिट वीज मोफत, शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरोग्य विमा अशा विविध योजना राबविल्या जातील, असे आश्वासनही खरगे यांनी वसईतील जनतेला दिले.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विजय पाटील आणि संदीप पांडे यांच्या प्रचारार्थ माणिकपूर येथील मैदानात स्वाभिमान सभा घेण्यात आली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.