२८.५९ कोटींच्या कल्याणकारी योजना कागदावरच

By admin | Published: April 2, 2015 04:45 AM2015-04-02T04:45:07+5:302015-04-02T04:45:07+5:30

ठाणे महापालिकेतील महिला व बालकल्याण योजना समितीमार्फत महिला बालकल्याण कार्यक्रमांतर्गत महापालिका हद्दीतील दुर्बल घटकांतील महिला, मुली

28.59 crore welfare schemes on paper | २८.५९ कोटींच्या कल्याणकारी योजना कागदावरच

२८.५९ कोटींच्या कल्याणकारी योजना कागदावरच

Next

ठाणे : ठाणे महापालिकेतील महिला व बालकल्याण योजना समितीमार्फत महिला बालकल्याण कार्यक्रमांतर्गत महापालिका हद्दीतील दुर्बल घटकांतील महिला, मुली, परित्यक्ता, विधवा, बचत गटांतील महिला, आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी शिक्षण, उपस्थितीभत्ता आदींसह विविध प्रकारच्या २४ योजनांचा पंचवार्षिक कार्यक्रम आखण्यात आला आहे. या योजनेला फेब्रुवारी २०१४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या योजनेत तब्बल २८ कोटी ५९ लाख ६० हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा प्रस्ताव मंजूर होऊन वर्ष लोटले तरीसुद्धा हा प्रस्ताव आजही कागदावर राहिला असून यातील एक रुपयादेखील खर्च झालेला नसल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मागील वर्षी काही अंशी महिलांना लाभ मिळाला होता. या योजनेच्या माध्यमातून महापालिका शाळेतील दुर्बल घटकांतील मुलींच्या पालकांना उपस्थितीभत्ता म्हणून ७५ लाख, इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ६० लाख, बारावीनंतरचे वैद्यकीय, तंत्रनिकेतन, कृषी, पशुवैद्यकीय, विधी, अभियांत्रिकी व व्यावसायिक यासारख्या देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी २५ लाख, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागासाठी २५ लाख, परदेशात उच्च शिक्षण ५० लाख, बचत गटातील व इतर महिला आणि मुलींना विविध व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षणासाठी १ कोटी १२ लाख ६० हजार, महिला व मुलींना रिटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण ३८ लाख ५० हजार, नोंदणीकृत बचत गटांना अनुदान म्हणून १ कोटी ६९ लाख, गरीब कुटुंबातील महिलांना व मुलींना स्वयंरोजगार अनुदानासाठी १ कोटी ९५ लाख, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांना स्वयंरोजगारासाठी १ कोटी ९५ लाख, कुष्ठरुग्णांसाठी (महिला) ७ लाख, निराधार, निराश्रित महिलांना स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्जपुरवठा घेतल्यास कर्जाच्या १० टक्के अथवा जास्तीतजास्त असणारी रक्कम अनुदान म्हणून ५ कोटी, बचत गटांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी २ कोटी ५० लाख, जिजामाता महिला आधार योजनेंतर्गत अनुदानापोटी ६७ लाख ५० हजार, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत येणाऱ्या बचत गट व दारिद्रयरेषेखालील महिलांसाठी ३६ लाख, आरोग्य शिबिरांसाठी ५४ लाख, महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, अभ्यासदौऱ्यासाठी २५ लाख, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५ लाख, समुपदेशन केंद्रासाठी ५ लाख, पाळणाघर ५० लाख, रस्त्यावरील मुले व घरातून पळून आलेली मुले यासाठी रात्रनिवारा व विशेष शाळांची व्यवस्था करण्यासाठी २५ लाख, प्रभाग समितीनिहाय महिला बचत गटाची महिला बाजार संकल्पना साकार करण्यासाठी २ कोटी २५ लाख, योजना प्रसिद्धी, पुस्तिका यासाठी ६० लाख व केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन अंमलबजावणीसाठी २ कोटी अशा प्रकारे २४ योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या ५० ते ५ हजारांपर्यंत अपेक्षित धरण्यात आली असून यासाठी २८ कोटी ५९ लाख ६० हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 28.59 crore welfare schemes on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.