राज्यातील 288 आमदार बिनकामाचे, शिवरायांच्या नावाचा वापर फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी- संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:54 AM2018-01-11T10:54:32+5:302018-01-11T10:57:24+5:30
राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे.
सांगली- राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते. आतापर्यंत शिवरायांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला, असा थेट आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.
सध्याच्या राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचं स्मारक व्हावे, असं का वाटत नाही? असा सवाल संभाजी भिडे यांनी यावेळी उपस्थित केला.
'आजपर्यत शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणं घेणं नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचं स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत, असं म्हणत संभाजी भिडे यांनी आमदारांवर निशाणा साधला.
यावेळी भिडे गुरुजींनी भाजपचे खासदार संजय पाटील यांनाही लक्ष्य केलं. खासदार संजय पाटील हे मराठा आहेत. पण शिवरायांचं स्मारक व्हावं, असं ते कधीही म्हणाले नाहीत. शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. आपला देश दहशतवाद, आंतकवाद यामध्ये सापडलेला आहे. मात्र तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अंमलात आणत नाही. राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभे केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.