'कॅट्स'च्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची 28वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 08:57 AM2017-10-21T08:57:32+5:302017-10-21T11:14:36+5:30
कॉम्बेट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल ऑफ गांधीनगरच्या पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला.
नाशिक - कॉम्बेट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुल ऑफ गांधीनगरच्या पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला. यावेळी 28व्या तुकडीच्या प्रशिक्षित 27 लढाऊ वैमानिकांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, सादर करण्यात आलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या हवाई प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. यावेळी चित्ता, चेतक, धुर्व हेलिकॉप्टर आणि पेराशूटद्वारे युद्धभूमीवर दाखल झालेले सैनिक आणि शत्रूच्या छावणीवर केलेला हल्ला सुरु झालेला गोळीबार बघून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. ऑपरेशन विजय काही मिनिटांत सैनिकांनी फत्ते केले आणि तत्काळ चित्ता, चेतक, धुर्व हेलिकॉप्टर चे आगमन आणि सैनिक या हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवरुन परततात. या प्रत्यक्षिकांनी डोळ्यांची पारणे फेडले.
याप्रसंगी स्कूलचे कामांडन्ट ब्रिगेडियर विनोदकुमार बाहरी, उपकामांडन्ट कर्नल चांद वानखेडे यांच्या हस्ते नव वैमानिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण कालावधीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल कॅ.गगनदीपसिंग, कॅ.विकास यादव, कॅ.आशीर्वाद, कॅ. अल्विन अब्राहम यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी अष्टपैलू कामगिरी साठी देण्यात येणारी मानाची सिल्व्हर चित्ता ट्रॉफी कॅ.गगनदीपसिंग यांनी पटकावली.
लढाऊ वैमानिक होऊन उत्कृष्ट योगदान भारताच्या संरक्षण करण्यासाठी द्यावे. भारतीय सैन्यचा पाठीचा कणा म्हणून लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांकडे बघितले जाते, हे विसरू नये, असा गुरुमंत्र बहारी यांनी 27व्या तुकडीला दिला.सोहळ्यानंतर उपस्थितांची हेलिकॉप्टर सोबत सेल्फी व छायाचित्रे काढण्यासाठी झुंबड उडाली होती.
श्रीलंका, फिलिपिन्स, लाहोस, कंबोडिया, अफगाणिस्तान या देशाचे सैनिक विशेष निमंत्रित म्हणून सोहळ्यला उपस्थित होते.