राज्यातील २९ टक्के विद्यार्थी ‘सरल’ बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:01 PM2020-10-05T12:01:46+5:302020-10-05T12:01:54+5:30
Education Sector News २९ टक्के विद्यार्थ्यांची नोंद अद्यापही शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये झालेली नाही.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या एकुण विद्यार्थ्यांपैकी २९ टक्के विद्यार्थ्यांची नोंद अद्यापही शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये झालेली नाही. त्यांची नोंदणी येत्या मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी आधार नोंदणी किंवा त्यामध्ये दुरूस्तीसाठी मार्च २०२१ पर्यंतची डेडलाइन शिक्षण विभागाने दिली आहे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर आधार नोंदणीचे दोन केंद्र आॅक्टोबरपासूनच सुरू करण्याचेही विभागाने २९ सप्टेंबर रोजी बजावले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्यात १ लाख १० हजार ३१५ शाळा सुरू आहेत. त्यामध्ये २ कोटी २५ लाख ६० हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, पाठ्यपुस्तक योजनांचा लाभ दिला जातो.
हा लाभ देण्यासाठी शासनाने शिक्षण विभागाची ‘सरल’ प्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीमध्ये एकुण विद्यार्थ्यांपैकी ६४ लाख ५९ हजार ३८८ विद्यार्थ्यांची नोंदणी अद्यापही झालेली नाही. त्यामध्ये काहींची दुबार नोंद झाल्याचेही पुढे आले आहे. तसेच काही अस्तित्त्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचीही नोंदणी झाल्याचे प्रकार घडले आहेत. हा गोंधळ थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवून त्याची पडताळणी केली जात आहे.