२९ हजार गृहलक्ष्मी झाल्या घरांच्या मालक; पुण्यातील महिलांनी घेतला सर्वाधिक लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 06:04 AM2024-04-21T06:04:53+5:302024-04-21T06:05:13+5:30
आर्थिक वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये राज्यातील सुमारे २९ हजार महिलांच्या नावे घर खरेदी केली असून, यातून २०१ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
पुणे - महिला घराची मालकीण बनावी, यासाठी राज्य सरकारने घर खरेदी करताना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली आहे. याचा सर्वाधिक लाभ पुण्यातील महिलांनी घेतला असून, या याेजनेंतर्गत १० हजार जणींनी स्वत:च्या नावे घर केले आहे.
राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ११ हजार ६६ महिलांच्या नावे घर खरेदी झाली होती. त्यातून ७२ कोटी ८३ लाख रुपयांची बचत झाली होती. या योजनेतील विक्रीची अट काढून टाकल्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये राज्यातील सुमारे २९ हजार महिलांच्या नावे घर खरेदी केली असून, यातून २०१ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
सुरुवातीला महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास महिला ते १५ वर्षे विकू शकत नव्हती. विकल्यास महिलेला १ टक्का मुद्रांक शुल्क व दंड वसूल करण्याची तरतूद होती. गतवर्षी सरकारने ही अट काढली. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास तीनपट प्रतिसाद वाढला.
- नंदकुमार काटकर, सहनोंदणी महानिरीक्षक
राज्यातील महिलांनी केली ७२.८३ कोटींची बचत
राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात या योजनेतून ११ हजार ६६ महिलांना लाभ देण्यात आला होता. त्यातून ७२ कोटी ८३ लाख रुपयांची बचत झाली. गेल्या आर्थिक वर्षात महिलांच्या नावे २८,९४२ घरांची खरेदी करण्यात आली. यातून मुद्रांक शुल्कापोटी २०१ कोटी १४ लाख रुपयांची बचत झाली.