२९ वर्षांत नक्षलवाद्यांनी केल्या ४९३ हत्या

By Admin | Published: August 4, 2014 12:49 AM2014-08-04T00:49:08+5:302014-08-04T00:49:08+5:30

अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध

In 29 years, 493 murders carried out by the Naxalites | २९ वर्षांत नक्षलवाद्यांनी केल्या ४९३ हत्या

२९ वर्षांत नक्षलवाद्यांनी केल्या ४९३ हत्या

googlenewsNext

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे. सर्वाधिक नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ४५१, गोंदिया जिल्ह्यात ३३ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ९ अशा एकूण ४९३ निरपराधांनी जीव गमावला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ३ आॅक्टोबर १९८२ रोजी सिरोंचा तालुक्यातील आमडेली येथील शिक्षक नारायण राजू मास्टर यांचे दोन्ही हात कापले. पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून १ फेब्रुवारी १९८५ रोजी पहिल्या निरपराध व्यक्तिची हत्या केली. भामरागड तालुक्यातील धोडराज येथील रामदास पुंगाटी असे या दुर्दैवी आदिवासी तरुणाचे नाव. गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास होऊ नये, यासाठी नक्षलवाद्यांनी सरपंचांनाही आपले लक्ष्य बनविले.
अहेरी तालुक्यातील खांदला गावचे सरपंच गंगाराम आत्राम यांची नक्षल्यांनी १३ फेब्रुवारी १९८८ रोजी हत्या केली. नक्षल्यांचे बळी पडलेले आत्राम हे पहिले सरपंच आहेत. आतापर्यंत नक्षल्यांनी ९ सरपंच व एका माजी सरपंचाची हत्या केली. नक्षल चळवळीत आपण भरकटलो गेलो, आपली फसवणूक झाली ही बाब लक्षात आल्यावर विकासाच्या मुख्य प्रवाहात जे नक्षलवादी सहभागी झाले, ज्यांनी आत्मसमर्पण केले अशा १४ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचीही हत्या केली. शिक्षकांनाही नक्षल्यांनी आपले बळी बनविले. गावपातळीवर तलाठी आणि पोलिस पाटलांना मदत करणाऱ्या कोतवालांचीसुध्दा हत्या केली. गावाची कायदा व सुव्यवस्था पाहणारे २४ पोलीस पाटील आणि ५ माजी पोलीस पाटलांना देखील नक्षल्यांनी ठार मारले. शासनाच्या विकास कामाचे कंत्राट घेऊन अतिदुर्गम भागात रस्ते, इमारती आणि पुलांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांनाही नक्षल्यांनी आपले लक्ष्य बनविले. ५ मे २०११ रोजी लग्न प्रसंगाला उपस्थित राहण्यासाठी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहनाला नक्षल्यांनी गडचिरोली-धानोरा दरम्यान भूसुरुंग स्फोटात उडविले. यात सहा लग्न वऱ्हाडी ठार झाले. याशिवाय जिल्ह्यातील आठ महिलांचीही नक्षल्यांनी हत्या केली आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेलेल्या सहा युवकांचीही नक्षल्यांनी हत्या केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असलेल्या अनेकांना आपले लक्ष केले. आपली माहिती गावातील नागरिक पोलिसांना देत असावेत, या संशयातून २०६ सामान्य नागरिकांना तर आपली दहशत कायम राहावी, या कारणाने १८८ नागरिकांना ठार मारले. गडचिरोली जिल्ह्यात १ फेब्रुवारी १९८५ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत नक्षलवाद्यांनी हे हत्यासत्र केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: In 29 years, 493 murders carried out by the Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.