राज्यात २९३ अनधिकृत गृहप्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:01 AM2018-05-05T06:01:43+5:302018-05-05T06:01:43+5:30
मुंबईसह राज्यात तब्बल २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचे काम राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे. याची गंभीर दखल घेत या गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईसह राज्यात तब्बल २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचे काम राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे. याची गंभीर दखल घेत या गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. या गृहप्रकल्पांनी आपल्या प्रकल्पांची नोंदणी महारेराकडे न करता परस्पर आपल्या गृहप्रकल्पांचे काम बिनधास्तपणे सुरू ठेवले आहे. त्यामुळेच महारेराने कारवाईचा बडगा उगारला आहे.
१ मे २०१७ पासून महारेरा कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानंतर ३० एप्रिल २०१८ पर्यंत महारेराकडे ९०३८ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी ७३२८ तक्रारी या वैध होत्या तर १७१० तक्रारी या अवैध होत्या. या १७१० तक्रारींपैकी ७०६ गृहप्रकल्पांविरोधात वारंवार तक्रारी महारेराकडे वर्षभरात येत होत्या. या सर्व सुनावणी झालेल्या तक्रारींचा महारेराकडून अभ्यास करण्यात आला.
महारेराकडून करण्यात आलेल्या या अभ्यासाअंतर्गत २९३ गृहप्रकल्प हे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे.
या गृहप्रकल्पात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील गृहप्रकल्पांची संख्या जास्त असून बाकी गृहप्रकल्प राज्यातील इतर ठिकाणचे आहेत. महारेराकडून याच गृहप्रकल्पांविरोधात आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे या अनधिकृत प्रकल्पांच्या भागातील नगरविकास अधिकारी, महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकांना या अनधिकृत गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठविल्या आहेत. त्यानुसार अनधिकृत गृहप्रकल्पांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश महारेराने संबंधित विभागांना दिले आहेत.