शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणखी ३-४ आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:34 AM2022-07-05T07:34:27+5:302022-07-05T07:34:53+5:30
सगळे झोपले की जायचो, सगळे उठायच्या आधी यायचो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडला बंडाचा प्रवास
मुंबई : सगळे झोपायचे तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो आणि सगळे उठण्याच्या आधीच परत यायचो, हा कार्यक्रम एका दिवसात झालेला नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर नाट्याचा पट सोमवारी विधानसभेत उलगडला.
ते म्हणाले, की मी मुख्यमंत्री झालो आहे याचा विश्वास मला अजूनही वाटत नाही. सत्तापक्षात असलेले ५० आमदार बाहेर पडून विरोधी पक्षासोबत गेले. नऊ मंत्र्यांनी त्यांची मंत्रिपदे दाव्यावर लावली. विधानपरिषद निवडणुकीनंतर मी विधानभवनातून निघालो. आदल्या दिवशी मी विचलित होतो. त्या निवडणुकीत मला वाईट वागणूक दिली गेली. हा काय करू शकतो, असे माझ्याशी वागले. दोन्ही बाजूंच्या आमदारांना हे ठाऊक आहे. पक्षातील आमदारांवर अन्याय होत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अन्यायाविरुद्ध उठाव केला पाहिजे; मी केला.
मी उठावासाठी निघालो तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन सुरू झाले. म्हणाले कुठे चाललात? मी त्यांना सांगितले मला माहिती नाही. माझ्यासोबतच्या एकाही आमदाराने आपण कुठे जात आहोत, काय करणार आहोत हे मला विचारले नाही. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. शिवसेनेत माझे खच्चीकरण करण्यात आले. सुनील प्रभूंना ते माहिती आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, शिवसेना वाचविण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही, असा निर्धार करून निघालो. सोबत असलेल्या आमदारांना एवढाच विश्वास दिला की, तुमचे नुकसान होऊ देणार नाही. तुमचे नुकसान होत आहे असे लक्षात येईल त्या क्षणी या जगाचा निरोप घेऊन निघून जाईल, असे सांगताना शिंदे भावुक झाले.
आणखी तीन-चार आमदार येणार असल्याचा दावा
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात केवळ १५ आमदार उरले असताना त्यातील आणखी तीनचार आमदार आपल्यासोबत येतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की संतोष बांगर काल रात्री माझ्याकडे आले. आणखी तीन-चार जण यायला तयार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मी कोणालाही जबरदस्तीने, बंदूक लावून आणले नाही.
सत्तांतराच्या नाट्यातील सर्वांत मोठे कलाकार हे देवेंद्र फडणवीसच होते. सगळे काही घडविणारे हे आहेत, कधी काय करतील याचा नेम नाही, असेही शिंदे म्हणाले. तसेच, पुढे भाषणात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा संदर्भ देत असतानाच शिंदे यांच्याकडे पाहत ‘सगळे काही सांगून टाकू नका’ असे फडणवीस म्हणाले आणि सभागृहात हशा पिकला.