जमाव बिथरला अन् राज्यात तिघांचा जीव गेला; ३ जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:31 AM2024-07-05T07:31:54+5:302024-07-05T07:32:05+5:30

शेळ्या चोरीचा आरोप करीत बेदम चोप, एकाचा मृत्यू

3 deaths in mob beating in 3 districts of the state | जमाव बिथरला अन् राज्यात तिघांचा जीव गेला; ३ जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जमाव बिथरला अन् राज्यात तिघांचा जीव गेला; ३ जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर - शेळ्या चोरी करतो, या संशयावरून तालुक्यातील पांगरमल गावात जमावाने आदिवासी महिलेचा विनयभंग करत तिघांना बेदम मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला. चांगदेव नामदेव चव्हाण (२५, रा. पखोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

रात्री साडेबारा वाजता सरपंच अमोल आव्हाडसह पाचजण कोयता, कुऱ्हाड, दांडके घेऊन आले. त्यांनी महिला, तिचा मुलगा व चांगदेव यास मारण्यास सुरुवात केली. नंतर सर्वांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले. तेथे २०-२५ जणांच्या जमावाने पुन्हा बेदम मारहाण केली.

सरपंचासह ६ अटकेत 
सरपंच अमोल आव्हाड, महादेव आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, आजीनाथ महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड (सर्व रा. पांगरमल) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

खंडणीसाठी वाळूच्या ट्रॅक्टरवर दगडफेक, १ ठार

राजुरा (चंद्रपूर) येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने काही युवकांनी ट्रॅक्टर अडवून चोहोबाजूंनी दगडफेक केल्याने एक मजूर ठार झाला, तर दोघेजण जखमी झाले. ही थरारक घटना गुरुवारी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास रामपूर धोपटाळा सीमेवरील वेकोलि वसाहतीच्या प्रवेशद्वारावर घडली. मोहम्मद खान राहत खान (वय ४०, रा. सोनियानगर, राजुरा) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी धोपटाळा गावचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रोहित नलिके, श्रविण नलिके, आशिष नुती, राज रायपुरे, स्वप्निल येरकला यांना अटक केली आहे.

छेड काढल्याच्या संशयावरून मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव येथे शेतीच्या कामांसाठी रोजंदारीने मजूर सांगायला गेलेल्या एका इसमाला (शेतकऱ्याला) काही लोकांनी मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव तालुक्यातील आसोदा गावात गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली.  भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) असे या घटनेतील मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

तासाभरापूर्वी केली होती लहान भावाशी चर्चा

सकाळी ११ वाजता भास्कर भंगाळे यांनी लहान भाऊ लीलाधर भंगाळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काही शेतीविषयक कामाबाबत चर्चा झाल्याची माहिती लीलाधर भंगाळे यांनी दिली. मात्र, नंतर त्याच्या मृत्यूचीच बातमी आली.

गुप्तांगावर मारहाण? 
भास्कर भंगाळे यांच्या शरीरावर बाह्य भागात कोणत्याही गंभीर स्वरूपाची इजा झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले नाही. मात्र, त्यांच्या गुप्तांगावर मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: 3 deaths in mob beating in 3 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.