Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे महामार्गावर आज ३ तासांचा ब्लॉक; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 09:50 AM2023-11-30T09:50:21+5:302023-11-30T09:52:08+5:30
Mumbai Pune Express Way : या काळात मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.
Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावरील पुलासाठी ५० टन वजनाचे गर्डर टाकण्याचे काम गुरुवारी केले जाणार आहे. या कामासाठी या तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पाली फाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम केले जात आहे.
या लेनवर दुपारी १२ ते ३ या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक खालापूर टोल नाक्याजवळील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक खालापूर टोलनाका येथे १ किलोमीटर अंतरासाठी पुणे लेनवरून वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहने ये-जा करत असतात. यातच या महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून असे ब्लॉक घेतले जात आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांची एकच तारांबळ होताना दिसून येते. पुढील काही महिने देखील ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या याची कामे या महामार्गावर सुरू आहेत.