महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत घटली ३.२५ लाख हे. शेतजमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:21 IST2025-03-16T06:20:50+5:302025-03-16T06:21:53+5:30
पेरणीच्या क्षेत्रातही ३.२४ लाख हेक्टरने झाली घसरण : जितकी एकूण शेतीयोग्य जमीन देशभरात कमी झाली, त्याच्या निम्म्याहून अधिक जमीन महाराष्ट्राने गमावली

महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत घटली ३.२५ लाख हे. शेतजमीन
चंद्रशेखर बर्वे -
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरले असतानाच राज्यात शेतीचे क्षेत्रफळ झपाट्याने कमी होत असल्याची चिंताजनक माहिती आहे. अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ ६ लाख ४२ हजार हेक्टरने कमी झाले आहे. यात महाराष्ट्रातील ३ लाख २५ हजार हेक्टर शेतीचा समावेश आहे. अर्थात पन्नास टक्क्यांहून अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झाले.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ब्रिजेंद्रसिंग ओला यांना लोकसभेत दिलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार, देशात शेतजमीन व पेरणीचे क्षेत्रफळ या दोन्ही गोष्टींचा आकार झपाट्याने घटत चालला आहे. सरकारने पाच वर्षांच्या कालावधीतील शेतजमिनीच्या उपयोगाबाबतचा अद्ययावत अहवाल जारी केला. यातील आकडेवारीनुसार, २०१८-१९ मध्ये भारतात १८ कोटी ६ लाख २४ हजार हेक्टर जमीन शेतीयोग्य होती. मात्र, २०२२-२३ मध्ये शेतजमिनीचे क्षेत्रफळ कमी होऊन १७ कोटी ९९ लाख ८२ हजार हेक्टरपर्यंत खाली आले. या पाच वर्षांत देशातील ६ लाख ४२ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्रफळ घटले.
ही आहेत कारणे...
राष्ट्रीय महामार्ग, राज्याचे रस्ते आणि रेल्वे लाईन यासारख्या पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासोबतच शहरीकरण आणि औद्योगिकीकरणासाठी कृषी जमिनीचा वापर होणे, देशातील शेतीचे क्षेत्र घटण्यामागचे प्रमुख कारण होय.
२०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत देश पातळीवर शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ कमी झाले असले तरी मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेशासह १० राज्यांत हे प्रमाण वाढले आहे.
१.६४ कोटी हेक्टर जमिनीवर राज्यात यंदा लागवड झाली.
५२ लाख हेक्टरवर कापूस
५० लाख हेक्टरवर सोयाबीन
३.७ कोटी हेक्टर राज्याचे एकूण क्षेत्रफळ
१.६५ कोटी हेक्टर जमीन शेती लागवडीखाली
अशी घटली शेतजमीन
२०१८-१९ पासूनच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील शेतीयोग्य जमीन घटली आहे आणि पेरणीचे क्षेत्रफळही कमी झाले आहे. २०१८-१९ मध्ये राज्यात २ कोटी ७ लाख १९ हजार हेक्टर जमीन शेतीयोग्य होती. २०२२-२३ मध्ये ही संख्या २ कोटी ३ लाख ९४ हजार हेक्टरपर्यंत खाली आली. अर्थात, पाच वर्षांत महाराष्ट्रात ३ लाख २५ हजार हेक्टर शेतीयोग्य जमीन कमी झाली.
असे घटले पेरणी क्षेत्र
पेरणीच्या क्षेत्रफळाबाबतही तेच घडले आहे. २०१८-१९ मध्ये १ कोटी ६८ लाख १५ हजार हेक्टरमध्ये लागवड झाली होती. तर, २०२२-२३ मध्ये पेरणीचे क्षेत्र घटून १ कोटी ६४ लाख ९१ हजार हेक्टरवर आले. थोडक्यात, पाच वर्षांत राज्यातील पेरणीचे क्षेत्र ३ लाख २४ हजार हेक्टरने कमी झाले.
वनक्षेत्र ९%
बिगर शेती १२%
लागवडीखाली नसलेली ८%
पडीक जमीन ९%