३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थी देणार ‘सीईटी’
By admin | Published: May 10, 2017 02:36 AM2017-05-10T02:36:59+5:302017-05-10T02:36:59+5:30
अभियांत्रिकीसह, औषधनिर्माणशास्त्र अशा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभियांत्रिकीसह, औषधनिर्माणशास्त्र अशा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी सीईटी) यंदा ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. राज्यातील १ हजार ११० उपकेंद्रांवर ११ मे रोजी पार पडणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात झेरॉक्स, फोन आणि इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
परीक्षेत एकून तीन प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल. त्यात प्रत्येकी ५० गुणांसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची सामायिक प्रश्नपत्रिका असेल, तर गणित आणि जीवशास्त्र विषयांसाठी प्रत्येकी १०० गुणांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयांसह १ लाख ४४ हजार ८१३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) विषयांसाठी ९५ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, याउलट ‘पीसीएमबी’साठी १ लाख ४९ हजार १६२ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. यामध्ये मुंबईतील ८० हजार ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी ठरवून दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. तरी सर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश सीईटी सेलचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिले आहेत.
२५ तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षा देणार-
या वर्षी तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे लिंग लिहिताना स्त्री, पुरु ष यांच्याबरोबर इतर असा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा पर्याय गेल्या वर्षीपासून उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षी मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.