दुर्गाडी पुलाच्या 3 मार्गिका 2020 मे अखेरपर्यंत खुल्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:02 PM2019-12-12T15:02:10+5:302019-12-12T15:02:24+5:30
कल्याणकरांच्या दृष्टीने दुर्गाडी पूल अत्यंत महत्वाचा असून गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे.
कल्याण : मुंबई - ठाण्याला जाण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या नव्या दुर्गाडी पुलाच्या सहापैकी 3 मार्गिकांचे काम हे येत्या मे 2020 पर्यंत पूल होईल अशी माहिती एमएमआरडीएतर्फे देण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नव्या दुर्गाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
कल्याणकरांच्या दृष्टीने दुर्गाडी पूल अत्यंत महत्वाचा असून गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. त्यामूळे यामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. दुर्गाडी चौक आणि वाहतूक कोंडी हे गेल्या काही महिन्यांपासून अविभाज्य समीकरण बनले आहे. बऱ्याचदा तर याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सहजानंद चौक, आधारवाडी चौकापर्यंत परिणाम झालेला पाहायला मिळतो.
या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी दुर्गाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच सध्या सुरू असणाऱ्या पुलाच्या कामाबाबत समाधानही व्यक्त केले. तर येत्या 31 मे 2020 पर्यंत या सहापदरी किमान 3 मार्गिका तरी सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे 3 महिने पुलाचे काम मागे पडले. परंतु आम्ही युद्ध पातळीवर काम करत असून डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण पुलाचे काम पूर्ण करण्याचा होणार असल्याचे 'एमएमआरडी'चे अधिकारी यांनी सांगण्यात आले.
दरम्यान, या पुलाबाबत आतापर्यंत दिलेल्या कोणत्याही डेडलाईन एमएमआरडीएने पाळल्या नसून मे 2020 ची डेडलाईन तरी ते पूर्ण करतात का लवकरच स्पष्ट होईल.