४५ हजार कोटींच्या घोषणेला ३ महिने उलटले; कोणत्याही विभागाला शासकीय सूचना नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:12 AM2023-12-08T08:12:31+5:302023-12-08T08:12:59+5:30
स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार, सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे.
विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा झाली होती. त्याला आता तीन महिने झाले तरी सरकारकडून अद्याप कोणत्याही विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आल्या नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार, सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे. ४५ हजार कोटी सर्व विभागांचे व पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी १४ हजार ४० कोटींच्या स्वतंत्र तरतुदीसह सुमारे ५९ हजार कोटींचे ते पॅकेज होते.
१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद
मराठवाड्याला पश्चिमी वाहिन्यांतून पाण्यासाठी १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली; परंतु याबाबत अद्याप काहीही हालचाल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या घोषणा बजेटमध्ये कधी येणार?
जलसंपदा विभागाला २१ हजार ५८० कोटी २४ लाख, तर सार्वजनिक बांधकामाला १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख रुपयांची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली. ४५ पैकी ३४ हजार ५१८ कोटी या दोन विभागांसाठीच दिले आहेत. उर्वरित १० हजार ४८२ पैकी ७ हजार ८६ कोटी जिल्हानिहाय विविध योजनांसाठी घोषित केले आहेत. ३,३९६ कोटी इतर कामांसाठी आहेत.
जलसंपदाचा मागील अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही, तर बांधकाम विभागाचे सुमारे ५ हजार कोटींचे देणे शिल्लक आहे.
त्यातच नव्याने केलेल्या घोषणा जिल्हा, हेडनिहाय राज्याच्या अर्थसंकल्पात घेऊन त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम सरकार कधी हाती घेणार? असा प्रश्न आहे.