दिगंबर आखाड्याचे ३ खालसे बहिष्कृत
By admin | Published: August 24, 2015 12:43 AM2015-08-24T00:43:57+5:302015-08-24T00:43:57+5:30
साधुग्राममधील चतु:संप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्यावर दिगंबर आखाड्याने बहिष्कार टाकूनही उपस्थित राहणाऱ्या तीन
नाशिक : साधुग्राममधील चतु:संप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्यावर दिगंबर आखाड्याने बहिष्कार टाकूनही उपस्थित राहणाऱ्या तीन खालशांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेराहभाई महात्यागी, डाकोर खालसा आणि महात्यागी केंब खालसा यांचा त्यात समावेश आहे.
रविवारी दिगंबर आखाड्याची बैठक होऊन महंत कृष्णदास, महंत वैष्णवदास, महंत रामकिशोरदास शास्त्री व दिगंबर आखाड्यांतर्गत येणाऱ्या ४५० खालशांच्या महंतांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. बहिष्कृत केलेल्या तीनही खालशांना दिगंबर आखाड्याने शाहीस्नानाला सोबत नेण्याचा प्रयत्न केल्यास सुमारे ४५० खालसे २९ आॅगस्टला होणाऱ्या शाहीस्नानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी साधुग्राममध्ये चतु:संप्रदाय आखाड्याचे ध्वजारोहण झाले. चतु:संप्रदाय आखाड्यावर दिगंबर आखाड्याचे वर्चस्व असल्याने दिगंबर आखाड्याच्या पंचरंगी ध्वजाचे इष्टदेवतेसमोर आरोहण करावे, अशी मागणी साधू-महंतांनी केली होती. परंतु चतु:संप्रदाय खालशाची ध्वजा लाल रंगाची असते, असे स्पष्ट करत लाल रंगाचा ध्वज फडकविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे दिगंबर आखाडा व खालशांनी ध्वजारोहण सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.
तेराहभाई त्यागी खालशाचे मनमोहनदास, डाकोरचे माधवाचार्य व महात्यागी केंब खालशाचे सीतारामदास यांनी हजेरी लावून पंचरंगी ध्वज, दिगंबर आखाडा व साधू-महंतांचा अपमान केल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)