३ हजार ६२२ पशुधनाचा ‘लम्पी’मुळे झाला मृत्यू; ३२ जिल्ह्यांमध्ये दिसून आला प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 07:10 AM2022-10-12T07:10:14+5:302022-10-12T07:10:26+5:30
सरकारी आणि खासगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशींचा अवलंब करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार ४०४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ७६ हजार ९२७ बाधित पशुधनापैकी एकूण ४३ हजार ९२ पशुधन उपचाराद्वारे रोगमुक्त झाले आहेत. उर्वरित बाधित पशुधनांवर उपचार सुरु आहेत तर राज्यात लम्पी आजारामुळे आतापर्यंत एकूण ३ हजार ६२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
सरकारी आणि खासगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशींचा अवलंब करावा. लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांचा औषधोपचार व लसीकरण करावे, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. लम्पी रोगाची लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू झाल्यास मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी लम्पी आजाराच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा, असे सिंह यांनी सांगितले.
८७.०६ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १२८.०१ लाख लस मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामधून एकूण १२१.८१ लाख पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, धुळे, अकोला, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या माहितीनुसार, राज्यात सुमारे ८७.०६ टक्के पशुधनाचे लसीकरण झाले आहे.