मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त ३ पक्षांची ३ मते; शरद पवार म्हणाले, आम्हाला स्वारस्य नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 08:26 AM2024-08-24T08:26:14+5:302024-08-24T08:53:52+5:30

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, चार भिंतींच्या आड तरी ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा.

3 votes of 3 parties in 'MVA' from the post of Chief Minister; Sharad Pawar said, we are not interested... | मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त ३ पक्षांची ३ मते; शरद पवार म्हणाले, आम्हाला स्वारस्य नाही...

मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त ३ पक्षांची ३ मते; शरद पवार म्हणाले, आम्हाला स्वारस्य नाही...

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभिन्नता दिसून आली आहे. तीन पक्षांची तीन वेगवेगळी मते समोर आली आहेत.  उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, चार भिंतींच्या आड तरी ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा.

ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्या पक्षाला मुख्यमंत्रिपद हा फॉर्म्युला ठरवू नये; कारण त्यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातात, कोणताही चेहरा ‘मविआ’ने ठरवावा, आपण पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. त्यावर शुक्रवारी शरद पवार यांनी सध्याच्या सरकारला पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे, आधी सत्तापरिवर्तन, असे म्हटले.

ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : बावनकुळे
मुख्यमंत्री होता यावे यासाठी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू शकतात; तर ते आपल्याही पाठीत केव्हाही खंजीर खुपसू शकतात, हे शरद पवार यांना  माहिती आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची कधीही चूक करणार नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला. 
उद्धव ठाकरे हे काँग्रेस व शरद पवार गटाच्या जाळ्यात फसले आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून आहेत. सोबतच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा मनसुबा आहे. यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी याचना करीत आहेत.  उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्या नावावर जसा खोटारडेपणा केला, तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील. मुख्यमंत्रिपद मिळविण्याकरिता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते; पण त्यांना तेथून पिटाळून लावले, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी निर्णय घेतील
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकमध्ये म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ हाच चेहरा बनून जनतेसमोर जाऊ.
नागरिकांनी ‘मविआ’ला सत्ता दिल्यास तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. चार भिंतींत तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, असा कोणताही विषयच चर्चिला गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्ता परिवर्तन महत्त्वाचे
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,  निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते.

Web Title: 3 votes of 3 parties in 'MVA' from the post of Chief Minister; Sharad Pawar said, we are not interested...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.