ऊस तोडणी कामगारांच्या टोळीवर घाला, टँकरच्या धडकेत ३ ठार; १७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 10:34 PM2018-01-14T22:34:43+5:302018-01-14T22:38:26+5:30
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरानजीक पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथे टँकर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. यात ३ ठार तर १७ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नीरा - पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरानजीक पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथे टँकर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. यात ३ ठार तर १७ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महिला जास्त जखमी असण्याची शक्यता.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा मोठा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी लोणंद, जेजुरी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, राजगड कारखान्यातील उस तोडणी कामगार जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. केतकावळे, नारायणपूर, जेजुरी असा प्रवास करून राजगड कारखान्यावर जाण्यास निघाले होते. नीरा नजीक पिंपरे येथे निरेहून पुण्याकडे जाणाºया टँकर ( एम एच ४३ वाय २७८१) व ट्रॅक्टर दरम्यान जोरदार धडक झाली. धडक इतकी भयानक होती की, ट्रॅक्टरमधील ऊसतोडणी मजूर रस्त्यावर सर्वत्र विखरून पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. जखमींना पोलिसानी तातडीने उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रुग्णालयात पाठविले. यातील काही रुग्णांना जेजुरी येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात एका दुचाकीला (एम.एच ४१- ए.एन-५६0६) धडक बसली आहे तर टँकर चालकही गंभीर जखमी झाली आहे. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.