चिमुकल्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू; धुळ्यातील मन सुन्न करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:49 PM2022-04-11T17:49:56+5:302022-04-11T17:50:06+5:30
रविवारी कमल पावरा व शारदा पावरा या कामासाठी शेतात गेलेले होते. झोपडीत झोपलेल्या ३ वर्षीय बालक अचानक आग लागल्याने घरातच अडकला.
धुळे - घरात कोणीही नसतांना रविवारी सायंकाळी अचानक झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घरात झोपलेला असतांना अचानक आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथील वरच्या गावाजवळील खळ्यातील झोपडीत कमल पावरा हे त्यांच्या पत्नी व दोन अपत्यांसह राहत होते.
रविवारी कमल पावरा व शारदा पावरा या कामासाठी शेतात गेलेले होते. झोपडीत झोपलेल्या ३ वर्षीय बालक अचानक आग लागल्याने घरातच अडकला. ही आग पाहून बाहेर खेळत असलेल्या मुलीने गावाकडे धाव घेत जवळच्या शेतात काम करत असलेले ग्रामस्थांना माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील इतर खळ्यांना देखील आग लागल्याने आगीत सर्व काही खाक झाले. यावेळी चिमुकल्याचे वडील शारदा पावरा घटनास्थळी दाखल होत तीन वर्षाचे मूल झोपडीत असल्याचे घटनास्थळी सांगितले, मात्र तोपर्यंत झोपडीतील रूपेश कमल पावरा या बालकाचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.