त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:19 AM2019-08-26T10:19:07+5:302019-08-26T10:26:18+5:30
कंदरमधील ते १९ जण ठरले पूरग्रस्तांचे देवदूत; मच्छिमारांनी केली दहा हजार लोकांना मदत
नासीर कबीर
करमाळा : सांगलीत मदतकार्य करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.
घरदार सोडून जिवाची पर्वा न करता दहा हजार पूरग्रस्तांना स्वत:च्या १२ बोटींतून तब्बल पाच दिवस अथक परिश्रम करून सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केले. या आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले.
सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना प्रथमत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हे महत्वाचे काम प्रशासनापुढे होते. करमाळा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी मच्छीमारांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाण्याचे आवाहन करताच क्षणाचाही विलंब न लावता स्वत:च्या बोटी घेऊन करमाळा तालुक्यातील भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणारे, पट्टीचे पोहणारे १९ युवक जीवावर उदार होऊन पाच दिवस मेहनत घेऊन दहा हजार पूरग्रस्तांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी नेले.
सांगली शहरातील विविध भागात पुराच्या पाण्यात अडकलेले वयोवृध्द,गंभीर आजारी,महिला,लहान मुले यांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे काम शिवाय दुमजली, तीनमजली इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना जेवण,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचे काम कंदर येथील रामभाऊ चव्हाण, धनाजी माने,शंकर माने,लखन चव्हाण,राहुल जाधव,सागर शिरतोडे, दशरथ बोडरे,संतोष माने,राहुल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, धनाजी माने, बंडू बोडरे,सखाराम माने,नागनाथ माने ,सुग्रीव चमरे, नीलेश भोई, शिवाजी चमरे, दयाराम चमरे,लहू भोई,संजय चमरे,कोंडिबा चंदर, सोमनाथ नगरे आदींनी केले.
त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला
सांगलीत मदतकार्य करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.