कोपरखैरणेमधील 3 युवक नागाव समुद्रात बुडाले; दोघांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:15 PM2018-05-26T12:15:00+5:302018-05-26T12:47:17+5:30
नागाव येथील समुद्रात हे तरुण शुक्रवारी संध्याकाळी पोहायला गेले होते.
जयंत धुळप /अलिबाग : कोपरखैरणे मधील चैतन्य किरण सुळे(20), आशिष मिश्रा(24) आणि सुहाद सिद्दगी (21) हे तिघे युवक शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता अलिबाग जवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बुडून समुद्रात बेपत्ता झाले होते. त्यांच्यापैकी आशीष मिश्रा याचा मृतदेह आज सकाळी कोर्लई किनारी तर सुहास सिद्दगी या मृतदेह आग्राव समद्र किनारी सापडला असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे. चैतन्य सुळे याचा शोध पोलीस व स्थानिक मच्छिमार बांधव घेत आहेत.
नवी मुंबईतील कोपरखैरणे मधील सेक्टर 16 व 17 येथे राहाणारे हे एकूण 13 मित्र शुक्रवारी एका मिनीबसमधून पिकनिककरिता नागाव समुद्रकिनारी आले होते. त्यापैकी हे तिघे रात्री 7.30 वाजता समुद्रात पोहायला गेले. परंतु ते समुद्रातून बाहेर आले नाहीत. परिणामी अन्य मित्रांनी स्थानिकांना या प्रकाराची माहिती दिली.आणि पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम सुरु केली.
अंधारात पोहायला जाऊ नका अशी सूचना या सर्वच मुलांना स्थानिक ग्रामस्थांनी दिली होती; अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.