पाणलोट विकासकामात ३० कोटींचा गैरव्यवहार
By admin | Published: July 18, 2015 12:12 AM2015-07-18T00:12:37+5:302015-07-18T00:12:37+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट विकासकामांमध्ये ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट विकासकामांमध्ये ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल २७ जुलै रोजी मिळाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच वसुंधरा पाणलोट विकासकामांमध्ये पर्यवेक्षक, कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शासन कोणती ठोस कारवाई करणार आहे, असा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, कोल्हापूरमधील शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे या प्रकरणी २५ मे रोजी तक्रार दाखल केली होती. त्यावर चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे, असेही राज्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)