राज्यात ३० कारखान्यांचे गाळप सुरू
By admin | Published: November 3, 2015 03:03 AM2015-11-03T03:03:55+5:302015-11-03T03:03:55+5:30
राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे.
- अरुण बारसकर, सोलापूर
राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे.
मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती व यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ऊस वाढीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यामुळे यंदा साखर गाळप हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील १७० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मागितली होती. या सर्व कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्यास एक महिन्याची मुदत देऊन गाळप परवाने दिले आहेत. काही साखर कारखान्यांनी एक आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, परंतु शासनाने १५ आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी दिली. त्यानंतर साखर कारखान्याच्या हंगामाला सुरुवात झाली. सोमवारी साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ ते ३० साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील चार, सांगली, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे ६ लाख ६ हजार ८९३ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील साखर कारखान्यांचे गाळप दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील अन्य कारखानेही दिवाळीनंतर सुरू होतील असे सांगण्यात आले.
कारखानदारांची उसासाठी स्पर्धा
दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र घटल्याने साखर हंगामावर परिणाम होणार असल्याने साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यास घाई सुरू केली आहे. मागील वर्षीच्या गाळपाला आलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिलेल्या काही कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी धजणार नाहीत. वाढलेले साखर कारखाने व ऊस क्षेत्र कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्याची घाई केली आहे.