नाशिकमधील ३० कुटुंबे वाळीत
By admin | Published: January 19, 2016 03:46 AM2016-01-19T03:46:56+5:302016-01-19T03:46:56+5:30
परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने येथील ३० कुटुंबे वाळीत टाकली असून त्यांना समाजातील कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात आहे.
नाशिक : परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने येथील ३० कुटुंबे वाळीत टाकली असून त्यांना समाजातील कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात आहे. त्यात परभणीच्या मोरे दाम्पत्याचा समावेश आहे. मोरे कुटुंबाने नाशिकमध्ये आसरा घेतला असून त्यांना धमक्या येत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला. परभणीतील सेलू येथील दीपक मोरे व त्यांची पत्नी सोनी यांनी गोंधळी समाजाच्या पंचांकडून भिशीच्या स्वरूपात ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडताना त्यांनी मूळ रकमेच्या तीनपट व्याज भरले. प्रत्येक वसुलीच्या वेळी पंचांना मद्य-मांसाहाराचा पाहुणचारही केला. मात्र त्यानंतरही कर्ज तसेच होते. पंचांनी सहा लाखांची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी पंचांनी घरात घुसून सोनी मोरे यांच्याशी असभ्य वर्तन केले. घराच्या दरवाजावर त्यांना बहिष्कृत केल्याची खूण म्हणून चप्पल बांधली, असे चांदगुडे यांनी सांगितले.
पंचांनी मोरे यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, घराचे पत्रे काढून नेले. त्याला घाबरून मोरे कुटुंबाने गावातून पळ काढत नाशिक गाठले व नातेवाईक सुभाष उगले यांच्याकडे आसरा घेतला. मात्र पंचांनी उगले यांनाही धमक्या दिल्या. त्यांना परभणीहून ‘वाळपत्र’ पाठवून समाजातून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे उगले व मोरे आता पोलिसांत जाण्याच्या तयारीत आहेत. मोरे हे नाशिकमध्ये स्वच्छता कामगार म्हणून तर त्यांची पत्नी जुने कपडे विकण्याचे काम करते. (प्रतिनिधी)