मिरज येथे कॅशव्हॅनमधून ३० लाखांची रोकड लंपास
By admin | Published: February 9, 2017 05:45 AM2017-02-09T05:45:43+5:302017-02-09T05:45:43+5:30
मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून ३० लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली
मिरज (जि. सांगली) : मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून ३० लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. परप्रांतीय चार जणांच्या टोळीने पाळत ठेवून ही चोरी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
शनिवार पेठेतील सतारमेकर गल्लीत स्टेट बँकेचे एटीएम आहे. दुपारी एक वाजता एसआयएस एजन्सीचे बाबासाहेब कांबळे, प्रशांत काटकर, दिगंबर धुमाळ (रा. सांगली) हे तिघे कर्मचारी जीपमधून आले. एटीएममध्ये भरण्यासाठी दहा लाखांची रोकड घेऊन ते एटीएममध्ये गेले. उर्वरित ३० लाखांची रक्कम असलेली बॅग त्यांनी जीपमध्येच ठेवली होती. ही संधी साधून रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपची काच फोडून चोरट्यांनी ३० लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. काच फुटल्याचा आवाज आल्याने दुकानदार दिलीप चौगुले यांनी पाहिले असता एक चोरटा त्यांना दिसला. त्यांनी आरडाओरडा करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा थोड्या अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून निघून गेला. याप्रकरणी कंपनीचा कर्मचारी दिगंबर महादेव धुमाळ याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सराईत चोरट्यांचे हे कृत्य असून सीसीटीव्ही फुटेजवरुन तपास सुरू असून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
परप्रांतीय टोळीकडून चोरीचा अंदाज
एजन्सीच्या तिन्ही कर्मचाऱ्यांकडे संशयावरून पोलिसांनी कसून चौकशी केली. तिघांना तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. मात्र त्यातून हाती काही लागले नाही.
आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा राज्यात वाहनांच्या काचा फोडून रोख रोकड चोरी करणाऱ्या टोळ्या आहेत. त्यांच्याकडूनच पाळत ठेवून हा डल्ला मारण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.