10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा
By Admin | Published: May 25, 2017 07:52 PM2017-05-25T19:52:52+5:302017-05-25T19:52:52+5:30
३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तीन आरोपींना पकडण्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले
ऑनलाइन लोकमत
औंढा नागनाथ, दि. 25 - 10 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांचा बदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तीन आरोपींना पकडण्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. नोटा बदलून देण्याची घटना औंढा नागनाथ येथील मंदिर परिसरात बुधवारी ५.३० वाजता घडली असून रात्री ११ वाजता याबाबत औंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खऱ्या नोटांच्या बदल्यात नकली नोटा देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक म्हणून पोलिस कर्मचारी गजानन निर्मले यांना पाठविले. निर्मले यांच्याशी नांदेड येथील आरोपी नसरुल्ला पठाण व देवकर रा. भोकर यांनी १० लाख रुपयांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचा करार झाला होता. यासाठी निर्मले यांनी त्यांना अॅडव्हान्स म्हणून १५,००० हजार रुपये दिले होते. हा करार पूर्ण करण्यासाठी नसरुल्ला पठाण यांनी बुधवारी बनावट नोटा घेवून एमएच-२६-एएफ-१३३९ या कारसह पाच जणांना औंढा येथील श्री नागनाथ मंदिराच्या पार्किंगमध्ये पाठविले होते. पोलिसांनी तेथे अगोदरच सापळा रचून ठेवला होता. दूरध्वनीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार गजानन मिर्नले हे गाडीजवळ जावून कराराप्रमाणे खातरजमा करीत असतानाच पोलिस अधीक्षक आरविंद चावडीया व सचिन गुंजाळ यांचा निर्देशावरून स्थागुशाचे पोनि मारोती थोरात, एपीआय केंद्रे, पीएसआय किसन राठोड, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तैयब आली, संतोष वाटोळे, विशाल घोळवे, वसंत चव्हाण, रामा सुब्रवाड यांनी कारकडे धाव घेवून आरोपींना पकडले. यावेळी एक आरोपी राजू उर्फ धर्मराज रा. निजामाबाद हा पोलिसांशी झटापट करून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तर श्रीनिवास हनमंडलू भोमपल्ली (३६ रा. जर्नालिस्ट कॉलनी, आरमूर, ता. आरमूर, जि. निजामाबाद), सैफ खान जान खान (२४, रा. इस्लापूर, जि.नांदेड), अन्वर खान गफूर खान (रा. हिमायतनगर, जि. नांदेड) या तीन आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ १ बाय १ च्या डब्ब्यामध्ये वरच्या बाजूने ५०० रुपयांच्या तीन खऱ्या नोटा आढल्या. तर त्याखाली लहान मुलांच्या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या १०० रुपयांच्या ४९८ नोटा होत्या. त्यावर भारतीय बच्चों का बँक व त्याखाली पांढऱ्या कागदाचे बंडल आढळून आले.
ही टोळी खऱ्या नोटा घेवून ग्राहकांना बनावट नोटा देतो म्हणून बनवाबनवी करणारी आहे. यामध्ये अनेकजण फसल्याचा तक्रारी आहेत. ही टोळी सराईत असून तेलंगण, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात त्यांचे जाळे आहे. त्यांनी तेलंगणामध्ये असे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. यामध्ये राजू उर्फ धर्मराज, नसरुल्ला पठाण, देवकर या अन्य तिघांवरही गुन्हा दाखल केला. एकूण सहा आरोपी आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार या बाहेरचा असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींना २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सरकारी वकील चेतन अग्रवाल यांनी आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अजून माहिती घेण्यासाठी त्यांना जामीन येवू नये, असा युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लोगही फंस रहे थे साब...
आरोपींची छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न काहीजण करीत होते. त्यातील एका आरोपी मेरी शादी रह गयी. फोटो मत निकालो और इधर-उधर मत भेजो, असे म्हणाला. त्यावर तुम ने थोडाही अच्छा काम किया, लोगों को फंसाया असे म्हणताच साब लोगही फंस रहे थे. उनकोही कम पैसों कें जादा पैसे करणे होते थे. खुदही हमारे पास पैसे मांगने आते थे. हम कभी किसी के पास नही गए.. असे सांगून लालच बुरी बला असल्याचेच एकप्रकारे सांगितले.