मिरजेत कॅशव्हॅनमधून भरदिवसा ३० लाख लंपास
By admin | Published: February 8, 2017 08:50 PM2017-02-08T20:50:37+5:302017-02-08T20:50:37+5:30
मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून 30 लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली
ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 8 - मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून 30 लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी भरदिवसा झालेल्या चोरीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय
शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शनिवार पेठेतील सतारमेकर गल्लीत स्टेट बँकेचे एटीएम आहे. दुपारी एक वाजता एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एसआयएस या एजन्सीचे तीन कर्मचारी जीपमधून (क्र. एमएच 10 बी 558) आले. एटीएममध्ये दहा लाख रुपये भरण्यासाठी बाबासाहेब कांबळे, प्रशांत काटकर, दिगंबर धुमाळ (रा. सांगली) हे कर्मचारी गेले. उर्वरित 30 लाखांची रक्कम असलेली बॅग त्यांनी जीपमध्येच ठेवलली होती.
तिघेही कर्मचारी गेल्याची संधी साधून रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपची काच फोडून 30 लाखांची रक्कम असलेली बॅग चोरून नेण्यात आली. काच फुटल्याचा आवाज आल्याने येथील दुकानदार दिलीप चौगुले यांनी पाहिले असता जीपच्या खिडकीतून
हात घालून बॅग चोरून नेताना एक चोरटा त्यांना दिसला. त्यांनी आरडाओरडा करून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा बॅग घेऊन थोड्या अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसला आणि दोघे महावितरण कार्यालयाच्या दिशेने पळून गेले.
भरदिवसा 30 लाखाची रोकड लंपास झाल्याच्या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी पाहणी केली. खासगी एजन्सीमार्फत स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यात येतात. सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून 60 लाख रुपये घेऊन शनिवार पेठेसह तीन ठिकाणी एटीएममध्ये 30 लाख रुपये भरण्यात आले होते. उर्वरित 30 लाखाच्या रखमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. 30 लाख रुपये गाडीत ठेवून एजन्सीचे तिन्ही कर्मचारी एकाचवेळी एटीएमकडे गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. याप्रकरणी कंपनीचा कर्मचारी दिगंबर महादेव धुमाळ याने शहर पोलिसांत फिर्याद दिली असून चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी
भरदिवसा एवढी मोठी रक्कम पळवण्याचा प्रकार गंभीर असून सराईत चोरट्यांचे हे कृत्य असल्याचा संशय पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केला. चोरट्यांच्या शोधासाठी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
परप्रांतीय टोळीकडून चोरीचा अंदाज
एजन्सीच्या तिन्ही कर्मचाऱ्यांकडे संशयावरून पोलिसांनी कसून चौकशी केली. तिघांना तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्या चौकशीत धागेदोरे सापडले नाहीत. आंध्रप्रदेश किंवा तेलंगणा राज्यात वाहनांच्या काचा फोडून रोख रोकड चोरी करणाऱ्या टोळ्या आहेत. अशा परप्रांतीय टोळीने एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या वहनावर पाळत ठेवून रकमेवर डल्ला मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून शोध सुरू
चोरटे गणेश तलावाकडून शनिवार पेठेपर्यंत आल्याने या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चित्रण झाले आहे काय, याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. घटनास्थळासमोर इंडियन म्युझिकल शॉप या दुकानातील सीसी टीव्हीत जीपमधील बॅग चोरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांचे चित्रण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.