‘त्या’ बसमुळे एसटीला बसणार दरमहा ३० लाखांचा भुर्दंड
By admin | Published: March 31, 2017 04:14 AM2017-03-31T04:14:20+5:302017-03-31T04:14:20+5:30
एसटी महामंडळाने प्रदूषणात भर घालणाऱ्या बीएस-३ प्रकारातील स्कॅनिया कंपनीच्या ५० एसी बस भाडेतत्त्वावर
मुंबई : एसटी महामंडळाने प्रदूषणात भर घालणाऱ्या बीएस-३ प्रकारातील स्कॅनिया कंपनीच्या ५० एसी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील तब्बल १५ बस मल्टिएक्सेल आहेत. व्होल्वो कंपनीकडून पर्यावरणपूरक कमी दरातील बीएस-४ प्रकारातील बस मिळत असतानाही प्रदूषणात भर घालणाऱ्या तसेच जादा इंधन खर्चामुळे दरमहा ३0 लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसणाऱ्या या बस घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ प्रकारातील वाहनांच्या विक्रीबाबत नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने त्यासाठी नवी नियमावली लागू होईपर्यंत बीएस-३ प्रकारातील वाहन विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे नोंदणी न झालेली वाहने भंगारात जाण्याची भीती आहे. असे असतानादेखील एसटी महामंडळाने याच प्रकारातील ५0 बस स्कॅनिया कंपनीकडून पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात भाडेतत्त्वावरील बससाठी व्होल्वो आणि स्कॅनियाकडून प्रति किलोमीटरमागे देण्यात आलेली किंमत ही सारखीच होती. तरीही स्कॅनिया कंपनीच्या बीएस-३ प्रकारातील सुरुवातीला १२ मीटरच्या १५ आणि १४.५0 मीटरच्या १५ अशा ३0 बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या बोर्डाने मान्यताही दिली. यातील १४.५0 मीटरच्या १५ बससाठी एसटीलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
कारण, १२ मीटरच्या गाड्यांसाठी प्रति किलोमीटर २१.२४ पैसे पडतात. मात्र १४.५0 मीटरच्या प्रत्येक गाडीमागे हीच किंमत प्रति किलोमीटरमागे २८ रुपयांपर्यंत जाते. दुसरीकडे व्होल्वो कंपनीकडे बीएस-४ प्रकारातील पर्यावरणपूरक प्रति किलोमीटर२१.२४ पैसे दराने सर्व ५0 गाड्या असतानाही प्रदूषण करणाऱ्या स्कॅनिया कंपनीच्या बस घेण्याचा हा उफराटा व्यवहार कसा काय मंजूर झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
बोलणे टाळले
स्कॅनिया बस भाडेतत्वावर घेण्यात येत असल्याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, नंतर बोलतो असे सांगून त्यांनी बोलणे टाळले.
२० टक्के अधिक इंधन
या बसचा टप्पा हा ६00 किलोमीटरप्रमाणे आहे.
यातील प्रत्येक किलोमीटरमागे २१ रुपये २४ पैशाऐवजी २८ रुपये माजावे लागणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे २0 टक्के अधिक इंधन खर्ची पडणार आहे.
त्यामुळे एसटीला या बसमुळे महिन्याला ३0 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे.