अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:36 AM2024-10-05T06:36:01+5:302024-10-05T06:36:13+5:30
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या कामगिरीबद्दल जवानांचे कौतुक करीत त्यांना सलाम केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडच्या घनदाट जंगलात घातपाताच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त करून जवानांनी ३० जणांना कंठस्नान घातले. शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरू झालेली चकमक रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच होती. अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई असून, माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.
गडचिरोलीपासून दोनशे किलोमीटरवर हे घटनास्थळ आहे. दंतेवाडा व नारायणपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील थुलथुली व नेंदूर या गावाजवळ दक्षिण अबूझमाडच्या जंगलात १७१ नक्षली दबा धरून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे अभियान राबविले. अचानक जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर परिसरात झडती घेतली असता सुरुवातीला सात नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, त्यानंतर नक्षल्यांनी पुन्हा जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यात आणखी काही नक्षली जवानांच्या गोळीचा निशाणा ठरले. रात्री ८ वाजेपर्यंत ३० नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी एके-४७, एसएलआरसह इतर नक्षल शस्त्रे व साहित्याचा साठा जवानांनी ताब्यात घेतला आहे. मृत नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतांत मोठ्या पदावरील नक्षल्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सर्व जवान सुरक्षित आहेत. या मोहिमेत राज्य पोलिसांच्या जिल्हा राखीव दलाच्या तसेच विशेष पथकाच्या जवानांचा समावेश होता.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या कामगिरीबद्दल जवानांचे कौतुक करीत त्यांना सलाम केला.
चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची नेमकी संख्या अजून निश्चित नाही. एकेक मृतदेह शोधून जंगलातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृत नक्षल्यांची ओळख पटल्याशिवाय त्यांचा महाराष्ट्रातील घातपाती कारवायांत सहभाग होता किंवा नाही हे सांगता येणार नाही. - प्रभात कुमार, पोलिस अधीक्षक, नारायणपूर, छत्तीसगड
नक्षलवाद्यांचा यंदाच्या वर्षी जवानांनी खात्मा केला आहे. दंतेवाडा आणि नारायणपूरसह बस्तर क्षेत्रातील सात जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
गडचिरोली कनेक्शनची चौकशी सुरू
अबूझमाडचे जंगल माओवाद्यांचा गड राहिला आहे. नक्षल्यांना हे जंगल सुरक्षित वाटते. गडचिरोलीतील घातपाती कारवायांची रूपरेषाही अनेकदा या जंगलात ठरलेली आहे.
चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे गडचिरोली ‘कनेक्शन’ अद्याप समोर आलेले नसले तरी त्यांची ओळख पटल्यानंतर रेकॉर्ड तपासून खातरजमा केली जाईल, असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सीमावर्ती भागात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेतली जात असून, नक्षल्यांनी जिल्हा हद्दीत एंट्री करू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करत आहे.