३० टक्के जणांना येतो ‘सायलंट हार्ट अटॅक’

By admin | Published: September 29, 2016 04:04 AM2016-09-29T04:04:01+5:302016-09-29T04:04:01+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे, पण महिला आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ३० टक्के जणांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे खूप उशिरा समजते.

30 percent of people get 'Silent Heart Attack' | ३० टक्के जणांना येतो ‘सायलंट हार्ट अटॅक’

३० टक्के जणांना येतो ‘सायलंट हार्ट अटॅक’

Next

- पूजा दामले,  मुंबई

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे, पण महिला आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ३० टक्के जणांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे खूप उशिरा समजते. कारण हृदयविकाराचा झटका आल्यावर छातीत दुखण्यापेक्षा अन्य लक्षणे त्यांच्यात दिसून येत असून, या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.
जबड्यापासून ते पोटापर्यंतच्या अवयवांमध्ये अति दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. याविषयी जनजागृती नसल्यामुळे अनेकदा ही दुखणी अंगावर काढली जातात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचे समजत नाही. उशिरा निदान झाल्यामुळे नुकसान जास्त प्रमाणात होऊन जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे इंटव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनिल शर्मा यांनी सांगितले.
अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्यावर जबडा दुखणे, खांदे दुखणे, पोटात गॅस झाल्यासारखे वाटून अस्वस्थ वाटणे ही लक्षणेही दिसून येतात. त्यामुळे सर्वांनीच विशेष काळजी घेतली पाहिजे. उच्चरक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्राल नियंत्रणात नसल्यास, हृदयविकाराचा धोका बळावतो. त्याचबरोबरीने मद्यपान आणि धूम्रपानामुळेही हृदयविकार जडण्याचे वय कमी झाल्याचे दिसून येते.
हृदयविकाराला आळा घालण्यासाठी जीवनशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. रोज व्यायाम, संतुलित आणि सकस आहार घेतल्यास हृदयविकाराला सहज लांब ठेवता येते. २५ वर्षांनंतर दर पाच वर्षांनी आणि ४० वर्षांनंतर प्रत्येक वर्षी सामान्य शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे ही डॉ. अनिल यांनी स्पष्ट केले.

हृदयविकार दिन का?
फ्रॅमिंगहॅम हार्टस्टडीमधील सर्व प्रथम वैद्यकीय चिकित्सा २९ सप्टेंबर १९४८ साली सुरू झाली. त्या रोग परिस्थिती विज्ञान (इपिडीमिलॉजीकल) अभ्यासामुळे हृदयविकारावर निष्णात उपचार निर्माण झाले. म्हणूनच २९ सप्टेंबरला ‘हृदयविकार दिन’ म्हणून पाळला जातो.

एक सिगारेट करते ११ मिनिटांनी आयुष्य कमी
तरुणांच्या हातात अगदी सहजनेते ‘स्टाईल’ म्हणून दिसणारी सिगारेट ही त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. एक सिगारेट ओढल्याने आयुष्यातील ११ मिनिटे कमी होतात.

हृदयविकाराची कारणे
अनुवांशिक जीवनशैली, तंबाखू खाण्याची सवय, मद्यप्राशन, धूम्रपान, सतत बसून काम करणे, स्थूलता , मानसिक ताणतणाव, चुकीची आहार पद्धती

कसा टाळू शकता?
स्थूलता कमी करा, तळलेले पदार्थ खाणे टाळा, तंबाखू खाणे सोडा, धूम्रपान करू नका, व्यायाम करा, चाला, मीठ कमी खा, रक्तदाबावर नियंत्रण ठेवा, मधुमेह वाढू देऊ नका, जास्त मानसिक ताण घेऊ नका, रक्तातील चरबीची तपासणी करून घ्या, रक्ताच्या नातेवाईकांना हृदयविकार असल्यास काळजी घ्या

Web Title: 30 percent of people get 'Silent Heart Attack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.