राणीच्या बागेत ३० वर्षांतील गर्दीचा उच्चांक
By admin | Published: March 20, 2017 03:42 AM2017-03-20T03:42:50+5:302017-03-20T03:42:50+5:30
पेंग्विन बघण्यासाठी रविवारी राणीच्या बागेत २० हजार मुंबईकरांची झुंबड उडाली़ गेल्या ३० वर्षांत राणीच्या बागेत प्राणी बघण्यासाठी झालेल्या गर्दीचा हा उच्चांक
मुंबई : पेंग्विन बघण्यासाठी रविवारी राणीच्या बागेत २० हजार मुंबईकरांची झुंबड उडाली़ गेल्या ३० वर्षांत राणीच्या बागेत प्राणी बघण्यासाठी झालेल्या गर्दीचा हा उच्चांक होता़ राणीच्या बागेचा आसपासचा परिसर मुस्लीम लोकवस्तीचा आहे़ त्यामुळे ईदच्या दिवशी येथे दहा ते बारा हजार पर्यटक येतात़ रविवारी येथे येणाऱ्यांची संख्याही दहा ते बारा हजारच असते़ इतर दिवशी येथे पाच ते सहा हजार पर्यटक येतात़ पेंग्विनमुळे गर्दीचा नवीन विक्रम झाला आहे़
महापालिकेच्या निवडणुका, राजकीय आरोप आणि प्रत्यारोप अशा घडामोडींनंतर, तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना पेंग्विनला पाहण्याची संधी मिळाली. रविवारी सुट्टीच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भायखळा येथील राणीच्या बागेत गर्दी केल्यामुळे, राणीची बाग हाउस फुल्ल झाली होती. सध्या मोफत असलेला पेंग्विन दर्शनासाठी १ एप्रिलपासून शंभर रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये ही पेंग्विन कक्षाबाहेर रांगाच रांगा लागणार आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने, राणीच्या बागेतील प्रशासनाने नियोजन केले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले. सुमारे २० हजार मुंबईकरांनी पेंग्विन कक्षाला भेट दिली. पेंग्विनला पाहण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. राजकारणातील मुद्दा झालेले पेंग्विन कक्षाचे शुक्रवारी लोकार्पण झाले. शनिवारी तब्बल १२ हजार मुंबईकरांनी पेंग्विनचे रूप डोळ््यात साठवले. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्यतो प्रयत्न केले. मुंबईकरांची लांबच लांब रांग लागल्यामुळे काही काळ पेंग्विन कक्ष बंद ठेवण्यात आले. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव कक्ष खुले करण्यात आले. रांग प्रवेशद्वाराबाहेर गेल्याने, काही काळ वाहतुकीचाही खोळंबा झाला. (प्रतिनिधी)
‘डोनाल्ड’ची मुंबईकरांना ही भुरळ-
बागेतील पेंग्विन कक्षातील हेम्बोल्ट जातीच्या पेंग्विनची मोल्ट, डेझी, पोपॉय, फ्लिपर, बबल, आॅलिव्ह अशी नावे आहेत. या पेंग्विनमध्येदेखील डोनाल्ड नावाच्या पेंग्विनची के्रझ मुंबईकरांमध्ये दिसून आली. कक्षात जाणाऱ्या प्राणिप्रेमींनी कक्षात प्रवेश करताच पेंग्विनला नावाने हाक मारतात.