एसटीच्या आणखी ३०० जादा बसेस
By admin | Published: August 25, 2015 02:54 AM2015-08-25T02:54:11+5:302015-08-25T02:54:11+5:30
रेल्वे आणि एसटीच्या जादा ट्रेन आणि बसचेही आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून आणखी ३०० जादा बस सोडण्यात येणार आहेत.
मुंबई : रेल्वे आणि एसटीच्या जादा ट्रेन आणि बसचेही आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून आणखी ३०० जादा बस सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त गेल्या वर्षी १ हजार ९१३ बस एसटी महामंडळातर्फे सोडण्यात आल्या होत्या. या वेळी
२ हजार जादा बसचे नियोजन करण्यात आले. यापैकी १,३०० बसेस ग्रुप बुकिंग पद्धतीने सोडण्यात येणार आहेत. १३ ते १६ सप्टेंबरपर्यंतचे ग्रुप आरक्षण ४ ते ७ आॅगस्ट या कालावधीत करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १,२५० बसेसचे ग्रुप बुकिंग पूर्ण झाले आहे. तर २ हजारपैकी उर्वरित ७०० बसचे आरक्षण हे १२ आॅगस्टपासून सुरू झाले. यातील ६७५ बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. एकूणच एसटीच्या जादा सेवांना मिळणारा चांगला प्रतिसाद आणि १७ सप्टेंबरपासून सुरू होणारा गणेशोत्सव पाहता आणखी ३०० बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा सोडण्यात येणाऱ्या एसटीच्या जादा बसची संख्या ही २,३००पर्यंत पोहोचणार आहे.