सत्तेसाठी नेते एकमेकांना भिडत असताना 300 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 09:59 AM2020-01-03T09:59:47+5:302020-01-03T10:00:59+5:30
सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नेतेमंडळी सत्तास्थापनेसाठी कसरत करण्यात व्यस्त होती. त्याचवेळी राज्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकासानीमुळे खचून गेलेल्या 300 शेतकऱ्यांनी या कालावधीत आत्महत्या केल्या.
मागील चार वर्षांत एक महिन्यात एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा आकडा मोठा आहे. याआधी 2015 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अनेकदा एक महिन्यात 300 आत्महत्यांचा आकडा पार केला होता. नोव्हेंबरमध्ये शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी लढत होते. तर महाराष्ट्रातील राजकीय पुढारी तोडफोडीचं राजकारण करण्यात व्यस्त होते.
सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.
दरम्यान राज्यातील मराठवाडा विभागात नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक 120 आत्महत्या झाल्या. तर विदर्भात 112 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. 2019 मध्ये एकूण 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 एवढा होता. सरकारी आकडेवारीनुसार अतिवृष्टीमुळे एक कोटी शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.