दिवसाला ३०० फाइल्स निकाली -मुख्यमंत्री
By admin | Published: December 2, 2014 04:30 AM2014-12-02T04:30:15+5:302014-12-02T04:30:15+5:30
दर्यावरचा कोळी आणि आगरावरचा आगरी हे महाराष्ट्राचे त्याहीपेक्षा कोकणाचे वैभव आहेत. आगरी समाजाचा पराक्रम छ. शिवाजी महाराजांच्या मावळयामध्येही आहे
डोंबिवली : दर्यावरचा कोळी आणि आगरावरचा आगरी हे महाराष्ट्राचे त्याहीपेक्षा कोकणाचे वैभव आहेत. आगरी समाजाचा पराक्रम छ. शिवाजी महाराजांच्या मावळयामध्येही आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. त्यामुळेच त्या समाजाप्रती विशेष जिव्हाळा असून त्यांना भेडसावणाऱ्या बहुतांशी अडीअडचणी मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत बसून-चर्चा करुन न्यायालयीन प्रक्रिया वगळता जेवढी प्रकरणे निकालात काढता येतील, तेवढी निश्चितपणे काढीन, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डोंबिवली आगरी महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी काढले.
येथील एमआडयीसी पसिरातील क्रीडा संकुलनाच्या पटांगणावर या महोत्सवाचा सोमवारी शुभारंभ झाला़ त्यावेळी उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजक गुलाब वझे यांनी मांडलेल्या समस्यांना उत्तर देतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, दिवसाला ३०० फाईल निकाली लावत असून सकाळी आलेली फाईल संध्याकाळपर्यंत विधी विभागासह अन्य तांत्रिक अडचणी वगळता तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाच संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्या पद्धतीनेच जेमतेम महिनाच झाला असून काम सुरु असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली परिसरातील आगरी बांधवांच्या समस्यांसंदर्भात ते म्हणाले की, या समाजबांधवांना एक महाविद्यालय काढायचे आहे, त्यासाठी तातडीने विचार केला जाईल व तसे कळविले जाईल, तसेच आगरी समाज भवनाची जी मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे ती न्याय प्रविष्ट असल्याने जो काही निर्णय येईल तोपर्यंत त्या जागेवर कोणालाही दावा करु देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)