महिलांसाठी येणार खास ३०० बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 05:32 AM2016-11-09T05:32:52+5:302016-11-09T05:32:52+5:30
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या पाच महापालिकांमध्ये केवळ महिलांसाठी तेजस्विनी बसेस चालविण्यात येणार
मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या पाच महापालिकांमध्ये केवळ महिलांसाठी तेजस्विनी बसेस चालविण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने आज या बाबतचा निर्णय घेतला. त्यासाठी ३०० बसेसकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकार करणार आहे.
या बसेसमधील तिकिटाचे दर प्रचलित दरानुसारच असतील, तसेच या बसेसमध्ये चालक व वाहकदेखील महिलाच असतील आणि सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ अशा बसेसच्या वेळा असतील. तथापि, हे दर, आसन व्यवस्था आणि बसेसच्या वेळा यात बदल करण्याचे अधिकार महापालिकेला असतील.
स्मार्ट ग्राम योजनेस मान्यता
स्मार्ट सिटीनंतर आता स्मार्ट ग्रामची योजना राज्यात राबविली जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत राज्यातील सर्व गावांना या योजनेत सहभागाची समान संधी मिळणार असून, त्यांना विकासासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करणे, गावागावात निकोप स्पर्धा होऊन स्वच्छता, पर्यावरण आरोग्याविषयी जागृती करणे, अशा माध्यमातून ग्रामपंचायतींना स्वयंवृद्धीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. (प्रतिनिधी)