सहकारी बँकांच्या खातेदारांनी केले ठेव विम्याचे १४ हजार कोटींचे दावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:39 AM2019-12-30T04:39:19+5:302019-12-30T04:39:32+5:30
रिझर्व्ह बँकेने दिली सप्टेंबर अखेरची आकडेवारी
मुंबई : सुमारे ६,५००कोटी रुपयांच्या घोटाळयाने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच देशभरातील अडचणीत आलेल्या सहकारी बँकांच्या खातेदारांनी ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळा’कडे त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी सुमारे १४,१०० कोटी रुपयांचे दावे दाखल केले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘फिनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट’मध्ये सप्टेंबर २०१९ अखेरची आकडेवारी देताना ही माहिती दिली आहे. मात्र सर्व ठेवीदारांना या दाव्यांची रक्कम येकाच वेळी देण्याची वेळ येणार नाही किंवा बऱ्याच दाव्यांची रक्कम कदाचित द्यावीही लागणार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ज्या बँकांवर निर्बंध लागू केले आहेत, ज्या बँका अवसायनात काढण्याचेआदेश झाले आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे अशा बँकांच्या ठेवीदारांनी दाखल केलेल्या दाव्यांची एकूण रक्कम १४,०९८ कोटी रुपये आहे. याची फोड देताना अहवालात म्हटले आहे की, यापैकी ३,४१४ कोटी रुपयांचे दावे राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांसंबंधीचे तर १०, ६८४ कोटी रुपयांचे दावे ‘पीएससी’ सह अन्य नागरी बँकांसंबंधीचे आहेत.
देशातील अनेक सहकारी बँकांची स्थिती सध्या नाजूक असून त्यांची प्रकरणे रिझर्व्ह बँक निरनिराळ््या स्तरांवर हाताळत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ३० सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमले आहेत. ठेवविमा कायद्यानुसार ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम विमा महामंडळाकडून देण्याची तरतूद आहे.असे असले तरी अशा सर्व बँकांच्या ठेवीदारांना एकाच वेळी विम्याचे पैसे देण्याची वेळ येणार नाही किंवा सध्या आजारी असलेल्या काही बँकांची आर्थिक स्थिती कालांतराने सुधारुही शकेल. त्यामुळे १४ हजार कोटी रुपयांचे दावे दाखल होणे ही असामान्य परिस्थिती नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
‘पीएमसी’ बँकेतील घोटाळा हा अलिकडच्या काळातील सहकारी बँकांमधील उघड झालेला सर्वात मोठा घोटाळा आहे. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता व ११,८०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झाला आहे. म्हणजेच बँकेचे ७३ टक्के अधिमूल्य या घोटाळ्याने कमी झाले आहे. दिवाळखोरीत गेलेल्या ‘एचडीआयएल’ या एकाच कंपनीला गेल्या ११ वर्षांत दिलेल्या कर्जांमध्ये हा घोटाळा झाला आहे.