राज्यातील जलाशयांतून ५७ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 05:52 AM2020-02-20T05:52:31+5:302020-02-20T05:52:47+5:30
टेरीचा अहवाल; देशात २८० गीगावॉट सौरऊर्जा शक्य
मुंबई : राज्यातील ३,१७३ चौ. किमी जलपृष्ठभागावर तरंगते सौर फोटोव्हॉल्टिक (पीव्ही) प्रकल्प उभारून ५७ हजार मेगावॉट एवढी सौरऊर्जा निर्मिती शक्य आहे. देशातील जलाशयांतून २८० गीगावॉट सौरऊर्जा निर्मिती शक्य असल्याचे टेरीच्या अहवालात म्हटले आहे. टेरीने सौरऊर्जा निर्मितीच्या विविध पर्यायांपैकी जलाशयांचा अभ्यास केला. त्यानुसार, एकूण १८,००० चौ. किमी जलपृष्ठभागावर तरंगते सौर पीव्ही प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात स्वस्त वीज मिळू शकेल. ऊर्जा पारेषण आयोगासाठी टेरीने तरंगत्या सौर पीव्ही प्रकल्पाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. त्यात राज्यनिहाय सौरऊर्जा निर्मितीचा तपशील आहे.
मध्यम व मोठ्या जलाशयांच्या जलपृष्ठभागाच्या ३० टक्के भागावर हा प्रकल्प राबवणे शक्य आहे. त्यानुसार २८० गीगावॉट क्षमता निश्चित केली आहे. सौर पीव्ही बसविण्यासाठी सलग जमीन लागते. ती नसल्याने सौरऊर्जेचे लक्ष्य गाठण्यासाठी तरंगत्या प्रकल्पांचा विचार व्हावा, असे अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक क्षमता महाराष्टÑ, कर्नाटकात जलाशयांच्या पृष्ठभागाचा काही प्रमाणात वापर करून २८० गीगावॉट सौरऊर्जेची निर्मिती होऊ शकते, असा अंदाज आहे. त्याची सर्वाधिक क्षमता महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेशमध्ये आहे. सौरऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी तरंगते सौर पीव्ही हा समर्थ पर्याय असू शकतो. त्यातून सौरऊर्जेचे राष्ट्रीय पातळीवरील लक्ष्य गाठणे शक्य होईल.