Corona Virus: राज्यात दहा दिवसांत आढळले तब्बल 30 हजार काेराेनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 07:20 AM2021-03-02T07:20:35+5:302021-03-02T07:20:56+5:30
Corona Virus: आराेग्य विभागाची माहिती; फेब्रुवारीत ४६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत पुन्हा कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूत वाढ होताना दिसत आहे. परिणामी, राज्य शासनासह मुंबई महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा संसर्ग नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात ४६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे तब्बल तीस हजार रुग्ण आढळले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मागील काही महिन्यांच्या तुलनेत कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात २८ हजार ७४, डिसेंबर महिन्यात २५ हजार १७७ आणि जानेवारी महिन्यात २१ हजार ६५ रुग्णांचे निदान झाले होते. या रुग्णसंख्येच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्याची संख्या पाहता प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टिकोनातून हा सतर्कतेचा इशारा असल्याचे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी मांडले आहे.
मुंबई महानगर परिमंडळाच्या तुलनेत राज्यात विदर्भातील वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे. याविषयी डॉ. जोशी यांनी सांगितले, मागील दोन आठवड्यांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, यंत्रणांसह सामान्य नागरिकांनीही हा सतर्कतेचा इशारा मानून करुणाविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील दोन महिन्यांत या नियमांविषयी सामान्य नागरिकांमध्ये आलेली शिथिलता हे संसर्गवाढीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीसह राज्य शासनाने या नियमांच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
किंचित दिलासा; दिवसभरात ८५५ नवे रुग्ण
nमुंबई : गेले चार दिवस मुंबईत एक हजाराहून अधिक काेराेना रुग्ण आढळून आले. मात्र, सोमवारी त्यात काहीशी घट झाली. दिवसभरात ८५५ नवे रुग्ण आढळून आले असून, ८७६ रुग्ण बरे झाले.
nनवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर, चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख २६ हजार ७७० वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा ११ हजार ४७४ वर पोहोचला आहे.
nमुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ लाख ४ हजार ७३६ वर पोहोचली आहे. सध्या ९,६९० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा काळ २४४ दिवस इतका आहे.
चेंबूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रुग्णावर गुन्हा दाखल
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने कडक नियम लागू केले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या नियमांना बाधित रुग्ण हरताळ फासत असल्याचे समोर येत आहे. क्वारंटाइन कालावधी सुरू असताना घराबाहेर फिरणाऱ्या चेंबूर, अतुर पार्क येथील रुग्णावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा येथील स्वस्तिक अथर्व या इमारतीत बाधित बाहेर फिरत असल्याने पालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या रुग्णाचा १४ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी ४ मार्च २०२१ रोजी पूर्ण होईल. मात्र, त्याआधी ताे बिनधास्तपणे घराबाहेर फिरत हाेता.