सहकार न्यायालय वकील संघाच्या अध्यक्षांविरुद्ध ३0७ विधिज्ञांची तक्रार
By admin | Published: August 10, 2014 07:04 PM2014-08-10T19:04:25+5:302014-08-10T19:04:25+5:30
सहकार न्यायालयाबाबत नवा वाद उपस्थित झाला आहे.
अकोला: सहकार न्यायालयाच्या उद्घाटनाचा सोहळा आटोपून आठवडा उलटला नाही, तोच सहकार न्यायालयाबाबत नवा वाद उपस्थित झाला आहे. अँड. सुभाषसिंह ठाकूर यांनी स्वत:ला सहकार न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष म्हणून पुढे केले. कार्यकारिणीचेही फलक लावून नवा वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्याविरूद्ध ३0७ विधिज्ञांनी बार असोसिएशनकडे तक्रार नोंदविली असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी बार असोसिएशनने १२ ऑगस्ट रोजी आमसभा बोलाविली आहे.
२ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती के.के. तातेड, सहकार अपिलीय न्यायालयाचे अध्यक्ष साळवे यांच्या उपस्थितीत सहकार न्यायालयाचे उद्घाटन झाले. त्यापूर्वी अकोला बार असोसिएशनचे अध्यक्षांनी १५ जुलै रोजी ठराव घेऊन सहकार न्यायालयाचे अध्यक्ष व कार्यकारिणीविषयी निवडणूक घेण्याचे बार असोसिएशनच्या फलकावर सुचित केले होते; परंतु सहकार न्यायालयाचे उद्घाटन होताच अँड. सुभाषसिंह ठाकूर यांनी स्वत:ला सहकार वकील संघाचे अध्यक्ष घोषित करीत त्यांची २८ विधिज्ञांची कार्यकारिणीही तयार केली. सहकार न्यायालयाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच, सहकार वकील संघाच्या कार्यकारिणीविरुद्ध बार असोसिएशनसह ३0७ विधिज्ञ आक्षेप नोंदविणार होते. परंतु विधिज्ञांनी शांततेची भूमिका घेतली.
यासोबतच काही विधिज्ञ कामगार न्यायालय, कर न्यायालय, ग्राहक मंच, कौटुंबिक न्यायालय, धर्मदाय आयुक्त न्यायालय आदींचे स्वयंघोषित अध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली करीत असल्याचा आरोप अँड. नंदकिशोर शेळके, अँड. प्रवीण तायडे यांनी केला. अँड. ठाकूर यांनी सहकार न्यायालय वकील संघाची कार्यकारिणी स्थापनेची परवानगी न घेतल्याने त्यांची कार्यकारिणी रद्द करण्यात यावी व नियमानुसार सहकार न्यायालयाच्या सदस्यांची नोंदणी करून अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करावी अशी मागणी केली आहे.