३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By admin | Published: March 8, 2017 02:09 AM2017-03-08T02:09:25+5:302017-03-08T02:09:25+5:30
सैन्य भरती घोटाळ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, एका आरोपीच्या बँक लॉकरमधून ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे.
ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, एका आरोपीच्या बँक लॉकरमधून ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे.
सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारी रोजी ४ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या २४ आरोपींना ठाणे पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील संतोष शिंदे हा मुख्य आरोपींपैकी एक असून, तपासादरम्यान त्याच्या आर्थिक उलाढालींबद्दल पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक रविवारी फलटण येथे गेले होते. पोलिसांनी संबंधित शिंदे याचे खाते असलेल्या बँकेच्या लॉकरची झडती घेतली असता, २१ लाख रुपये रोख आणि सुमारे १0 लाख रुपयांचे दागिने आढळले. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी प्रश्नपत्रिकेचा सौदा १ कोटी ३५ लाख रुपयांमध्ये केला होता. त्यापैकी ५0 लाख रुपयांचा अग्रीम आरोपींना देण्यात आला होता. ही रक्कम रविकुमार, धरमसिंग, निगमकुमार पांडे आणि संतोष शिंदे यांनी आपसात वाटून घेतली होती. संतोष शिंदे याच्याजवळील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित आरोपींचे व्यवहार तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सद्य:स्थितीत या प्रकरणाचा तपास फलटण आणि नागपूर या दोन शहरांभोवती फिरत आहे.
कर्मचाऱ्यांना भेटी
सैन्य भरती घोटाळ्यातील एका आरोपीने नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना महागडे मोबाइल फोन भेट दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. १७ हजार रुपयांचा एक याप्रमाणे तीन मोबाइल फोन भेट देण्याचे आणि सैन्य भरती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ते स्वीकारण्याचे कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलीस पथक नागपुरात
या प्रकरणाचा तपास सातारा जिल्ह्यातील फलटण आणि नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयाभोवती फिरत आहे. आरोपींच्या जबाबातून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यातील सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले आहे.