राज्यात वर्षभरात 317 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, १७२ कोटींची वसुली; महावितरणच्या भरारी पथकाची ऐतिहासिक कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:47 AM2022-06-10T07:47:59+5:302022-06-10T07:48:12+5:30
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज वापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीज यंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे.
मुंबई : वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने आता वीजचोरांविरुद्ध कंबर कसली असून, भरारी पथकांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये २२ हजार ९८७ ठिकाणी ३१७ कोटी ४५ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी १७२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर, २०२२-२३ मध्ये ६०० पेक्षा अधिक दशलक्ष युनिट वीजचोरी उघड करण्याचे लक्ष्य आहे.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज वापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीज यंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे. त्यासाठी महावितरणची माहिती व तंत्रज्ञान प्रणाली वापरण्याची या विभागाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वीजचोऱ्यांच्या संख्येऐवजी विजेच्या युनिटची अधिक चोरी होणाऱ्या ठिकाणी आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
किती ठिकाणी स्मार्ट चोऱ्या उघडकीस
विभाग ठिकाणे रक्कम
कोकण ७८३४ १५२ कोटी ४३ लाख
पुणे ५५२७ ७२ कोटी
नागपूर ५५०३ ६३ कोटी २३ लाख
औरंगाबाद ४१२३ २९ कोटी ८० लाख
कुठे किती पथके
राज्यात परिमंडल स्तर- ८
मंडल स्तर - २०
विभागीय स्तर - ४०
एकूण - ७१ पथके
सुमारे ३४५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत
मंडलस्तरावर नोव्हेंबर २०२१ मध्ये नव्याने २० पथके स्थापन करण्यात आली
वीजचोरी ही महावितरणला लागलेली कीड आहे, वीजचोरीचे प्रकार कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाहीत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयासोबतच सुरक्षा व अंमलबजावणीच्या पथकांनी वीजचोरीविरुद्ध कठोर कारवाई करावी.
- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण