रस्ते अपघातात ३१७ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Published: January 19, 2017 03:18 AM2017-01-19T03:18:42+5:302017-01-19T03:18:42+5:30

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये २०१६ या वर्षामध्ये तब्बल १८५४ अपघात झाले

317 passengers die in road accident | रस्ते अपघातात ३१७ प्रवाशांचा मृत्यू

रस्ते अपघातात ३१७ प्रवाशांचा मृत्यू

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये २०१६ या वर्षामध्ये तब्बल १८५४ अपघात झाले आहेत. यामध्ये ३१७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५५५ गंभीर जखमी झाले आहेत. १०७४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे २०१५ च्या तुलनेमध्ये ३३९ अपघात कमी झाले असले तरी रोज सरासरी ५ अपघात हीही चिंतेची गोष्ट आहे.
देशात सर्वात झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराचा समावेश आहे. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्ग, पळस्पे ते जेएनपीटी महामार्ग, ठाणे-बेलापूर व पामबीच रोड हे प्रमुख रस्ते या परिसरातून जात आहेत. वाहतूक सुरळीत होण्याऐवजी हे महामार्ग मृत्यूचा सापळा ठरू लागले आहेत. वाहतूक पोलिसांकडील आकडेवारीप्रमाणे २०१६ या वर्षामध्ये रोज सरासरी पाच अपघात झाल्याची नोंद आहे. नोंद न झालेल्या किरकोळ अपघातांची संख्या लक्षात घेतली तर रोज किमान ८ ते १० अपघात होत आहेत. २८४ प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये तब्बल ३१७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपवाद वगळता रोज किमान एका व्यक्तीचा बळी अपघाताने घेतला आहे. याशिवाय ४०५ मोठ्या अपघातांमध्ये ५५५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर दुखापतीमुळे काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले तर काहींना ६ महिने ते १ वर्ष घरी आराम करावा लागला आहे. याशिवाय १०७४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. २०१५ मध्ये एकूण अपघातांची संख्या २१९३ होती, ती २०१६ मध्ये १८५४ झाली आहे. ३३९ अपघात कमी झाले आहेत. पण मृत्यूंची संख्या फक्त ४ ने कमी झाली आहे. पोलिसांनी वर्षभर राबविलेल्या अभियानामुळे व केलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात अपघात कमी करणे शक्य झाले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. पावसाळ्यामध्ये वाशी ते सीबीडी दरम्यान रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. यामुळे जुईनगरजवळ सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय पामबीच रोड व मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अतिवेगाने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्यांमध्ये २० ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश जास्त आहे.
अपघात थांबविण्यासाठी पोलीस जनजागृती करत आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातूनही नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. पण जोपर्यंत चालक स्वयंशिस्त पाळत नाहीत तोपर्यंत अपघात थांबणार नाहीत, असे मत पोलीस व्यक्त करत आहेत.
>नेरूळमधील भीमाशंकर सोसायटीमध्ये राहणारे तरूण २३ मार्चला पुण्यावरून नवी मुंबईकडे येत असताना भाताण बोगद्याजवळ कारला अपघात झाला. या अपघातामध्ये प्रशांत पाटील व निखिल सुद या दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय नगरसेवक रवींद्र इथापे यांचे चिरंजीव राहुल इथापे याच्यासह प्रतीक धुमाळ, अमर वाणी, सचिन चव्हाण हे तरूण जखमी झाले होते.
>मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ४ जून २०१६ रोजी खासगी बसला भीषण अपघात झाला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तब्बल १७ प्रवाशांचा मृत्यू झाला व ३० प्रवासी जखमी झाले. बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली होती. २०१६ मध्ये झालेला हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्वात भीषण अपघात ठरला.
>एक्स्प्रेस-वेवर २७ डिसेंबरला ट्रक, बस व दोन ट्रेलरमधील भीषण अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. चार गाड्या एकमेकांना धडकल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
>रस्ते अपघात ही देशासमोरील सर्वात गंभीर समस्या झाली आहे. बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकांमुळे होत असतात. अतिवेगाने वाहने चालविणे व नियमांचे पालन न केल्याने अपघात होत असतात. खराब रस्त्यांमुळेही अपघात होत आहेत. अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या लक्षणीय असून त्यामुळे देशाच्या क्रयशक्तीवर परिणाम होत आहे. अपघात रोखणे ही फक्त पोलिसांची जबाबदारी नसून यामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- विनय (बंडू) मोरे,
अध्यक्ष,
रस्ता सुरक्षा प्रतिष्ठाण

Web Title: 317 passengers die in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.