31 ऑक्टोबरपासून काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन, अहमदनगरमधून होणार सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 03:06 PM2017-10-26T15:06:05+5:302017-10-26T15:10:32+5:30
सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
मुंबई- सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासाठी सरकारविरोधात 31 ऑक्टोबरपासून काँग्रेसकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता करण्यात येईल. मुंबईत राधाकृष्ण पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते.
नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला असून देशाचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होतं आहे. त्याचदिवशी काळा दिवस पाळणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ असून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नाही. अटी शर्ती घालून शेतक-यांना कर्जमाफीतून वगळलं आहे. राज्यात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरु असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे. २००८-०९ च्या कर्जमाफीत गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे. सरकारला त्याची आता आठवण का येतेय? तेव्हा विरोधक म्हणून हे काय करत आहे, असा सवालही अशोक चव्हाण यांनी विचारला. कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीची अट तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
अशोक चव्हाण यांनी आधार कार्डाच्या सक्तीवरूनही सरकारवर टीता केली आहे. आधार कार्डाची सक्ती राज्य सरकारने केली. बँकांनी ही सक्ती केली नव्हती. कमीतकमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हेतूनेच तारीख पे तारीख आणि नवनवीन नियमांचा घाट घातला गेल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. राज्यात सत्तेत बसलेल्या नेत्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. त्याच्यावर पकड नाही. एका दिवसात वीस वीस जीआर निघतायत. त्यामुळे हे सरकार घालवायला हवं. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं.
सरकारने अपमानास्पद वागणूक दिली
इतिहासात कधी नाही एवढी अपमानास्पद वागणूक या सरकारने दिली असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हंटलं. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना इतकी अपमानास्पद वागणूक कधी मिळाली नाही. शेतक-यांचा आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचा फुटबॉल झाला आणि हे मात्र फिफा खेळत बसलेस असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
कर्जमाफीच्या यादीत आलेल्या बोगस नावांची चौकशी करा
कर्जमाफीच्या यादीत आलेल्या बोगस नावाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.