मुलांना नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाख ३७ हजारांना गंडा
By admin | Published: July 14, 2017 12:04 AM2017-07-14T00:04:15+5:302017-07-14T00:04:15+5:30
मुलांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून शहरातील दोन सेवानिवृत्त इसमांना सुमारे ३२ लाख ३७ हजारांना गंडा घातल्याचा गंभीर प्रकार
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 मुलांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून शहरातील दोन सेवानिवृत्त इसमांना सुमारे ३२ लाख ३७ हजारांना गंडा घातल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात मजहर इस्माईल शेख (५१, रा. जयदीपनगर, वडाळारोड) यांच्या फिर्यादीवरून मुलाला नोकरीस लावून देण्याच्या आमिषापोटी संशयित अजीम शेख, जहीर शेख, मनोज सहाणे यांनी पाच लाख ८७ हजार रुपये वेळोवेळी धमकावून उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याच संशयितांनी अल्ताफ बशीरखान पठाण (५२, रा. बोधलेनगर) हे सध्या सेवानिवृत्त असून बांधकाम व्यावसायिक आहेत. यांनाही वरील संशयितांनी मुलाला नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत पाच लाख रुपये रोख स्वरूपात सुरुवातीला घेतले. त्यानंतर सोळा लोकांना नोकरीच्या संधी असल्याचे सांगून प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार पठाण यांनी परिचयातील लोकांकडून प्रत्येकी ५० हजार असे आठ लाख रुपये जमा करून संशयित आजिम शेख यास दिल्याचे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर संशयितांनी चौदा लोकांची अजून गरज असून, तोपर्यंत भरती पूर्ण होणार नाही, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून पठाण यांनी पुन्हा १४ लोकांकडून प्रत्येकी ५० हजारप्रमाणे सात लाख रुपये जमा केले व आजिमला दिले. त्यानंतर अभियंता पदासाठी जागा निघाल्याचे सांगितल्यानंतर पठाण यांनी पुन्हा एका मित्राकडून ५ लाख रुपये घेऊन आजिम यास दिले. या भामट्याने अजून दीड लाखाची मागणी करत पठाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पौर्णिमा बस थांब्यावर भीतीपोटी पठाण यांनी पुन्हा दीड लाख आजिमला नेऊन दिले. असे एकूण २६ लाख ५० हजार रुपयांना या तिघांनी पठाण यांना गंडा घातला. दोन्ही फिर्यादींचे चार महिन्यात मिळून ३२ लाख ३७ हजार रुपये या तिघा संशयितांनी लांबविल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.